भारतीय महिला क्रिकेटसाठी २ नोव्हेंबर २०२५ हा दिवस संस्मरणीय ठरला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ५२ वर्षे ज्या ट्रॉफीची वाट पाहिली ती अखेरीस २०२५ मध्ये भारतीय संघाने पटकावली. भारतीय महिला संघ विश्व चॅम्पियन झाल्यानंतर सर्वजण संघाचे कौतुक करत असताना, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांचे एक जुनं वक्तव्य वेगाने व्हायरल होत आहे.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा कार्यकाळ वादांच्या भोवऱ्यात होता. २०१४ मध्ये आयपीएल सट्टेबाजी प्रकरणानंतर त्यांना पद सोडावे लागले. महिला क्रिकेटबद्दल नकारात्मक विधानं केल्यामुळे ते नेहमी चर्चेत असत. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकल्यानंतर, माजी भारतीय महिला कर्णधार डायना एडुलजी यांचे जुने विधान पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.

२०१७ मध्ये एका मुलाखतीत डायना एडुलजी म्हणाल्या होत्या, “जेव्हा श्रीनिवासन बीसीसीआयचे अध्यक्ष झाले, तेव्हा त्यांचं अभिनंदन करण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की जर मला शक्य असतं तर मी कधीही महिला क्रिकेट होऊ दिलं नसतं. त्यांना महिला क्रिकेट कधीचं पटलं नाही.”

डायनाजी पुढे म्हणाल्या, “मी नेहमीच बीसीसीआयवर टीका करत आले आहे, विशेषतः २००६ पासून जेव्हा महिला क्रिकेट बीसीसीआयच्या छत्राखाली आलं. बीसीसीआयने नेहमीच पुरुषांना प्राधान्य दिलं आहे. त्यांना या क्षेत्रात महिलांनी बोलावं किंवा निर्णय घ्यावं असं वाटत नव्हतं. मी खेळाडू असूनही या मुद्द्यावर मोकळेपणाने बोलली होती.”

२०१७ मध्ये दिलेल्या मुलाखतीत पुढे डायनाजी म्हणाल्या, “आताही, मी अजूनही असं म्हणेन की महिला क्रिकेट चांगली कामगिरी करत आहे हे बीसीसीआयमध्ये अद्यापही स्वीकारलेलं नाही. त्यांच्यासाठी (काही बीसीसीआय सदस्यांसाठी) या संघाने खूप चांगले कामगिरी केली हे स्वीकारणं कठीण आहे.”

पण जय शाह बीसीसीआयचे सचिव झाल्यावर महिला क्रिकेटमध्ये अनेक बदल करण्यात आल्याचं दिसलं. त्यांच्या कार्यकाळात महिला क्रिकेटमध्ये मोठे बदल करण्यात आले, ज्यात महिला प्रीमियर लीगची सुरुवात झाली. पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी समान सामना फी आणि महिला क्रिकेटला त्यांची खरी ओळख परत मिळवून देण्यासाठी अनेक सुधारणांचा समावेश होता.