नवी दिल्ली : कुमार गट, वरिष्ठ तसेच महिला गटातील निवड समिती सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच समितीमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शुक्रवारी निवड समिती सदस्य पदांसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांना १० सप्टेंबरपूर्वी अर्ज करण्याची विनंती करण्यात आली आहे.

निवड समितीमधून कोणाला वगळले जाणार हे अजून स्पष्ट नसले, तरी ‘बीसीसीआय’ने पुरुष निवड समितीसाठी दोन आणि महिला निवड समितीमधील तीन जागांसाठी अर्ज मागवले आहेत. उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ गटातील एस. शरथ यांना कुमार गट निवड समितीचे अध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे.

पुरुष निवड समितीचे अध्यक्षपद सध्या अजित आगरकर यांच्याकडे असून, शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, अजय रात्रा, एस. शरथ हे अन्य सदस्य आहेत. आगरकर यांना नुकतीच जून २०२६ पर्यंत करारवाढ देण्यात आली आहे. मात्र, बॅनर्जी आणि दास यांच्यापैकी एकाचे स्थान धोक्यात येऊ शकेल अशी चर्चा आहे. या दोघांचाही कार्यकाळ अजून बाकी आहे.

कुमार गटात तिलक नायडू यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीत कृष्ण मोहन, रणदेव बोस, पथिक पटेल, एच. एस. सोधी यांचा समावेश आहे. अध्यक्ष नायडू यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी असल्यामुळे त्यांना बदलणे जाण्याची शक्यता आहे. नायडू यांनी तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. त्यामुळे ते स्वतःहून पद सोडतील अशी अपेक्षा आहे.

कुमार गटाच्या निवड समितीसाठी प्रग्यान ओझा, तर वरिष्ठ गटासाठी आर. पी. सिंह इच्छुक असल्याचे समजते. वृद्धिमान साहा, मनोज तिवारी, अशोक डिंडा हेसुद्धा निवड समिती सदस्य पदासाठी उत्सुक असले, तरी निवृत्तीनंतर त्यांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण व्हायचा आहे. त्यामुळे ते या पदासाठी पात्र ठरत नाहीत. पुढील वर्षीच्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी निवड समितीत बदल करण्याची खरच गरज आहे का असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

महिला निवड समिती सध्या नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असून, रेणू मार्गारेट, आरती वैद्य, कल्पना वेंकटचार आणि शामा डे शॉ या अन्य सदस्य आहेत. यामधून केवळ शॉ यांना कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे.

निकष तोच…

निवड समिती सदस्यांसाठीचे पात्रता निकष बदलण्यात आलेले नाहीत. किमान सात कसोटी किंवा ३० प्रथमश्रेणी सामने खेळलेले खेळाडू सदस्यपदासाठी अर्ज करू शकतात. दुसरा पर्याय म्हणून किमान दहा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि २० प्रथमश्रेणी सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूंचाही विचार केला जाईल.