मुंबईच्या वानखेडे मैदानातील इमारतीत असलेलं बीसीसीआयचं मुख्यालय येत्या काही वर्षांमध्ये बंगळुरु शहरात हलवलं जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी अर्थात (NCA) चे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बीसीसीआयचं मुख्यालय बंगळुरुला हलवलं जाण्याचे संकेत सुत्रांकडून मिळत आहेत. बंगळुरु शहराबाहेर ४० एकरांच्या जागेवर बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं बांधकाम सुरु आहे. हे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बीसीसीआयचा मुंबईतून चालणारा प्रशासकीय कारभारही बंगळुरुतून चालवला जाण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मते मुंबईतील भाड्याने घेतलेल्या जागेऐवजी बंगळुरुत स्वतःच्या इमारतीत मुख्यालय हलवणं सोयिस्कर ठरेल. बंगळुरुतल्या नवीन इमारतीमध्ये पंचतारांकित हॉटेलप्रमाणे राहण्याची सुविधाही असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार क्रिकेट प्रशासकीय समितीनेही दिल्ली, मुंबई, बंगळुरु सारख्या शहरात पंचतारांकीत हॉटेलमध्ये होणाऱ्या बैठकींवरच्या खर्चामध्ये कपात करण्याचा सल्ला दिला आहे. या दृष्टीकोनातून बंगळुरुची जागा ही बीसीसीआयसाठी मोक्याची ठरु शकणार आहे.

अवश्य वाचा – BLOG: आशा-निराशेच्या चौकोनात भारतीय क्रिकेट!!

बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी.के.खन्ना यांनी बीसीसीआयशी संबधीत सर्व राज्यांच्या क्रिकेट बोर्डांना पत्र लिहून त्यांचं मत मागवलं आहे. “अनेक अधिकाऱ्यांच्या मते सध्या मुंबईत असलेली जागा बीसीसीआयचा प्रशासकीय कारभार चावण्यासाठी पुरेशी नाही. या कारणासाठी बंगळुरुतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या जागेत बीसीसीआयचं नवीन मुख्यालय तयार करण्यात आल्यास ते सर्वांसाठी सोयीचं ठरेलं.” आपण लिहीलेल्या पत्रात खन्ना यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यामुळे मुख्यालय बंगळुरुला हलवण्याच्या निर्णयावर सर्व राज्यांच्या क्रिकेट संघटना नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.