BCCI AGM Meeting New Rule: आज म्हणजेच २८ सप्टेंबरला बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत बरेच मोठे निर्णय घेण्यात आले. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची निवड करण्यात आली आहे. तर भारतीय वरिष्ठ संघाच्या निवड समितीमध्ये दोन नवीन नावांचा समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर भारतातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आयपीएलसंबंधित एक नवा नियम जाहीर करण्यात आला आहे.
आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळणं ही क्रिकेटपटूंसाठी मोठी गोष्ट म्हटलं जातं, मग नावाजलेले खेळाडू असोत किंवा मग येऊ घातलेले नवे क्रिकेटपटू. खेळाडूंना लहान वयातच या लीगमध्ये खेळून आपलं कौशल्य दाखवत नाव कमावण्याची संधी असते. वैभव सूर्यवंशीलाही फक्त १३ वर्षांचा असताना या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि आज त्याने आपल्या कामगिरीने सर्वांची मनं जिंकत आपली ओळख तयार केली आहे.
बीसीसीआयच्या नव्या नियमानुसार आता अंडर-१६ क्रिकेटपटूंना आयपीएलमध्ये खेळणं सोपं नसणार आहे. आता कोणताही क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीप्रमाणे कमी वयात आयपीएल खेळू शकणार नाही. बीसीसीआयने याबाबत कोणता नवीन नियम आणला आहे, जाणून घेऊया.
१६ वर्षांखालील क्रिकेटपटूंना आता आयपीएलमध्ये खेळण्यासाठी किमान एका प्रथम श्रेणी सामन्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. प्रथम श्रेणी सामन्याशिवाय ते आयपीएलमध्ये खेळण्यास पात्र ठरणार नाहीत. २८ सप्टेंबर रोजी बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या नवीन नियमाला मान्यता देण्यात आली.
पूर्वी, आयपीएलमध्ये खेळण्यासाठी खेळाडूंसाठी वयाचे कोणतेही बंधन किंवा विशेष नियम नव्हते. पण, बीसीसीआयने आता खेळाडूंनी प्रथम श्रेणी सामने खेळणं आवश्यक असल्याचं बंधन घातलं आहे. रिपोर्ट्सनुसार, आता फक्त अशा खेळाडूंनाच आयपीएलमध्ये प्रवेश मिळेल ज्यांनी किमान एक प्रथम श्रेणी सामना खेळला आहे.
१३ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये केलं होतं पदार्पण
वैभव सूर्यवंशी हा आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. २०२५ च्या आयपीएल लिलावात त्याला राजस्थान रॉयल्सने १.१० कोटी रुपयांना खरेदी केले होतं. राजस्थानने त्याला संघात सामील केलं तेव्हा तो फक्त १३ वर्षे आणि २४३ दिवस वयाचा होता. वैभव सूर्यवंशीप्रमाणेच, इतर अनेक अंडर-१९ क्रिकेटपटूंनी आयुष म्हात्रे, मुशीर खान आणि आंद्रे सिद्धार्थसह विविध आयपीएल फ्रँचायझींसोबत करार केला आहे.