देशातील करोनाची साथ वेगाने वाढल्यामुळे लांबणीवर पडलेली प्रतिष्ठेची रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा दोन टप्प्यांत आयोजनाची योजना आखली जात आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिली.

देशातील ३८ प्रथम श्रेणी संघांचा समावेश असलेली रणजी स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होणार होती. मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली.

‘बीसीसीआय’ची २७ मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटला (आयपीएल) प्रारंभ करण्याची योजना आहे. त्यामुळे रणजी स्पर्धा एकाच टप्प्यात खेळवणे कठीण आहे. त्यामुळे अनेक राज्य संघटनांच्या विनंतीवरून स्पर्धेच्या आराखड्यासाठी ‘बीसीसीआय’ने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘रणजी स्पर्धेच्या आयोजनासाठी विविध पर्यायांचा आम्ही आढावा घेत आहोत. पुढील महिन्यात पहिला टप्पा आणि ‘आयपीएल’नंतर दुसरा टप्पा खेळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत,’’ असे धुमाळ यांनी सांगितले. फेब्रुवारी ते मार्चपर्यंत पहिला टप्पा आणि जून-जुलैमध्ये दुसरा टप्पा घेण्याबाबत ‘बीसीसीआय’ आग्रही आहे.