भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवत पाचव्यांदा अंडर १९ क्रिकेट वर्ल्डकप पटकावला. स्पर्धेत दमदार कामगिरी केलेल्या भारताच्या यंगिस्तानचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अनेकजण ट्विटर, सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघ आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सदस्यांचे अभिनंदन करत आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारताच्या या विश्वविजेत्या खेळाडूंसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिसांची घोषणा केली आहे.

वर्ल्डकपविजेत्या प्रत्येक खेळाडूला ४० लाख आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला २५ लाखाचे बक्षीस जय शाह यांनी जाहीर केले आहे. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. तुम्ही अभिमानास्पद कामगिरी केल्याचे शाह यांनी ट्वीटमध्ये म्हटले.

हेही वाचा – IPL 2022 Mega Auction: अंडर १९ वर्ल्डकपमधील ‘हे’ दोन मराठी क्रिकेटर होणार करोडपती?

असा रंगला सामना…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला ४ गड्यांनी धूळ चारली आणि विश्वविजेतेपदावर नाव कोरले. भारत पाचव्यांदा अंडर १९ विश्वविजेता ठरला आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हाच निर्णय त्यांच्या अंगउलट आला. भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ १८९ धावांत आटोपला. इंग्लंडकडून जेम्स रियूने ९५ धावांची झुंज दिली. तर बावाने ५ बळी घेत इंग्लंडच्या डावाला सुरूंग लावला. प्रत्युत्तरात भारताने आपले सहा फलंदाज गमावले, पण उपकर्णधार शेख रशीद आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने विजय मिळवला. यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला होता. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. राज बावाला सामनावीर पुरस्कार मिळाला. तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.