BCCI vs PCB on Asia Cup 2025 : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आशियाई क्रिकेट परिषदेच्या सर्व स्पर्धांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आपला निर्णय एसीसीला कळवला आहे. बीसीसीआयने पुढच्या महिन्यात श्रीलंकेत महिला इमर्जिंग टीम्स आशियाई करंडक व सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पुरुषांच्या द्वैवार्षिक आशियाई करंडक स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दी इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी हे सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) एकटं पाडण्याची तयारी करत आहे. आशियाई करंडक स्पर्धेतून माघार घेणं हा त्याच हालचालींचा एक भाग आहे. पाकिस्तानचे मंत्री नेतृत्व करत असलेल्या आशियाई क्रिकेट परिषदेने आयोजित केलेल्या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने खेळू नये, अशी देशातील जनतेची भूमिकी असून आम्ही त्या भूमिकेचा आदर करतो, असं बीसीसीआयने म्हटलं आहे. महिला इमर्जिंग टीम्स आशियाई करंडक स्पर्धेसाठी आम्ही आमचा संघ पाठवणार नसल्याचं आम्ही एसीसीला तोंडी कळवलं आहे, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
एसीसीच्या भविष्यातील स्पर्धांमध्ये आम्ही सहभागी होणार नाही, असंही बीबीसीआयने स्पष्ट केलं आहे. आम्ही सतत भारत सरकारच्या संपर्कात आहोत, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
भारताशिवाय आशियाई क्रिकेट स्पर्धा भरवणं अवघड?
बीसीसीआयच्या या भूमिकेमुळे येत्या सप्टेंबर महिन्यात भारतात खेळवल्या जाणाऱ्या पुरुषांच्या आशियाई करंडक स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश व श्रीलंका या संघांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा मागे पडू शकते. कदाचित ही स्पर्धा रद्द देखील होऊ शकते. कारण भारतीय संघाशिवाय ही स्पर्धा खेळवणं व्यवहार्य ठरणार नाही. कारण अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे बहुतेक प्रायोजक हे भारतातील आहेत. तसेच भारत-पाकिस्तान सामन्यांशिवाय प्रसारकांनाही या स्पर्धेत फारसा रस नसेल.
२०२४ मध्ये सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने (एसपीएनआय) १७० दक्षलक्ष अमेरिकन डॉलर्समध्ये पुढील आठ वर्षांसाठी आशियाई करंडक स्पर्धेचे हक्क खरेदी केले आहेत. यंदाची स्पर्धा खेळवली नाही तर या करारात बदल करावे लागू शकतात.