BCCI New Jersey Sponsor: भारतीय संघ आशिया चषक २०२५ स्पर्धेत जर्सी स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरला आहे. आतापर्यंत भारतीय संघाच्या जर्सीवर ड्रीम इलेव्हन झळकत होतं. पण भारत सरकारने ऑनलाईन गेमिंगवर बंदी घातल्यानंतर ड्रीम इलेव्हेनला बीसीसीआयसोबत असलेला करार रद्द करावा लागला. दरम्यान मंगळवारी बीसीसीआयने नव्या जर्सी स्पॉन्सरशिपची घोषणा केली आहे. बीसीसीआयने अपोलो टायर्ससोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. हा करार २०२८ पर्यंत कायम राहणार आहे.
इथून पुढे भारतीय पुरूष आणि महिला संघाच्या तिन्ही फॉरमॅटमधील जर्सीवर अपोलो टायर्सचा लोगो झळकणार आहे. आशिया चषक २०२५ स्पर्धेत भारतीय संघ जर्सी स्पॉन्सरशिवाय मैदानात उतरला आहे. यासह भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाविरूद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत देखील जर्सी स्पॉन्सरशिवाय खेळत आहे.
एका सामन्यासाठी किती पैसे मिळणार?
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार,बीसीसीआय आणि अपोलो टायर्स यांच्यात ५७९ कोटींचा करार झाला आहे. बीसीसीआयला एका सामन्यासाठी अपोलो टायर्सकडून ४.५ कोटी रूपये मिळणार आहेत. याआधी ड्रीम इलेव्हेनसोबत बीसीसीआयने ३५८ कोटींचा करार केला होता. आशिया चषक स्पर्धेनंतर भारतीय संघाला महत्वाच्या मालिका खेळायच्या आहेत. येत्या ३० सप्टेंबरपासून आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघ अपोलो टायर्सचा लोगो असलेली जर्सी घालून मैदानात उतरणार की नाही,हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
भारतीय संघाची आशिया चषकात दमदार कामगिरी
दुबईत आशिया चषक २०२५ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने यूएईचा एकतर्फी पराभव केला. भारतीय संघाचा स्पर्धेतील दुसरा सामना रविवारी पाकिस्तानविरूद्ध पार पडला. या सामन्यातही भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणयाचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला २० षटकांअखेर १२७ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने १६ षटकात विजय मिळवला. यासह भारताने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला. स्पर्धेतील सलग २ सामने जिंकून भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे.