लोढा समितीच्या सुधारणांची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणींबाबत अहवाल तयार करण्यासाठी आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सात सदस्यीय विशेष समिती नेमली असून, भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा या समितीत समावेश आहे.
टी. सी मॅथ्यू (केरळ क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष), नबा भट्टाचार्जी (मेघालय क्रिकेट असोसिएशनचे सचिव), जय शाह (गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव) यांना या समितीत समाविष्ट करण्यात आले असून, बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी आणि प्रभारी सचिव अमिताभ चौधरी या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील. रविवारी मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण समितीच्या बैठकीमध्ये ही समिती निश्चित करण्यात आली.
‘‘बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सी. के. खन्ना नियमितपणे या समितीच्या कार्याचा आढावा घेतील. मग हा अहवाल बीसीसीआयच्या सदस्यांकडे सादर करतील,’’ असे अमिताभ चौधरी यांनी सांगितले. लोढा समितीच्या सुधारणांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाची पुढील सुनावणी १४ जुलैला आहे.
आयपीएलचे प्रायोजकत्व विवोकडे कायम
नवी दिल्ली : आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व विवो या मोबाइल निर्मिती कंपनीकडे आगामी पाच वर्षांसाठी कायम ठेवण्यात आले आहे. आगामी पाच वर्षांच्या प्रायोजकत्वासाठी विवोने तब्बल ५५४ टक्के अधिक रकमेची बोली लावत हे अधिकार मिळवले आहे. आगामी पाच वर्षांसाठी विवोने तब्बल २,१९९ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावली होती.