रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि न्यूझीलंड मंगळवारी तिसऱ्या वनडे सामन्यात आमनेसामने येणार आहेत. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. शेवटच्या वनडेपूर्वी तीन भारतीय खेळाडू महाकालचा आशीर्वाद घेण्यासाठी उज्जैनला पोहोचले. महाकाल मंदिराला भेट दिलेल्या खेळाडूंमध्ये सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या नावांचा समावेश आहे. महाकालच्या भस्म आरतीमध्ये खेळाडूही सहभागी झाले होते. भस्म आरती व्यतिरिक्त वादकांनी गर्भगृहात अभिषेक केला.

‘मिस्टर 360’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूर्यकुमारने तिसऱ्या वनडे सामन्यातील विजयासह ऋषभ लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केला. तो म्हणाला, “आम्ही पंत लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली. त्याचे पुनरागमन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्ही न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकली आहे आणि आता आमची नजर अंतिम सामन्यावर आहे.”

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक पंत गेल्या महिन्यात कार अपघातात जखमी झाला होता. या अपघातात तो थोडक्यात बचावला. पंत बराच काळ संघाबाहेर गेला आहे. रविवारी रात्री खेळाडूंच्या आगमनाची माहिती मंदिर समितीला मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. सामन्यापूर्वी आणखी काही खेळाडू महाकालच्या दर्शनासाठी पोहोचण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – IND vs NZ: न्यूझीलंड पुन्हा ठरला कर्दनकाळ! आधी क्रिकेट, आता हॉकी… टीम इंडियाचे स्वप्न विश्वचषकात अनेकदा भंगले

विशेष म्हणजे, भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत २-० अशी अजेय आघाडी कायम ठेवली आहे. आता या मालिकेत किवींना क्लीन स्वीप करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारताने पहिला सामना १२ धावांनी आणि दुसरा सामना ८ विकेटने जिंकला. न्यूझीलंड संघाने अद्याप भारतात एकही वनडे मालिका जिंकलेली नाही. न्यूझीलंडने भारतात एकूण ७ एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत.