Ben Stokes Ends 2 Years Century Drought with Record: इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने भारताविरूद्ध चौथ्या कसोटीत कमालीची फलंदाजी करत तब्बल २ वर्षांनी कसोटीमध्ये शतक झळकावलं आहे. अष्टपैलू खेळाडू असलेल्या बेन स्टोक्सने मँचेस्टर कसोटीत ५ विकेट्स घेतरले आणि त्यानंतर आता त्याने शतकी कामगिरी केली आहे. यासह स्टोक्सने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.
बेन स्टोक्स इंग्लंडकडून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. त्याने जो रूटबरोबर संघाचा डाव सावरत शतकी भागीदारी रचली. पण तिसऱ्या दिवशी खेळत असताना स्टोक्सला सातत्याने पायात क्रॅम्प येत होते. ज्यामुळे त्याला चालताना प्रचंड त्रास होत होता. पण तरीही स्टोक्सने मैदानावर राहत कमालीचे फटके खेळत आणि प्रसंगी संयमाने फलंदाजी करत संघाचा डाव पुढे नेला.
स्टोक्सच्या पायाच्या दुखणं एका क्षणाला इतकं वाढलं की त्याने रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस इंग्लंडने झटपट विकेट गमावल्यानंतर स्टोक्स पुन्हा मैदानावर उतरला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बेन स्टोक्स ७७ धावा करत माघारी परतला. यानंतर चौथ्या दिवशी फलंदाजीला आल्यानंतर स्टोक्सने तासाभरातच आपलं शतक पूर्ण केलं. स्टोक्सने १६४ चेंडूत ९ चौकारांसह १०३ धावा करत आपलं शतक पूर्ण केलं. यासह बेन स्टोक्सने कसोटीमध्ये २ वर्षांनी शतक केलं आहे. यापूर्वी स्टोक्सने अॅशेस मालिकेत लॉर्ड्सच्या मैदानावर २०२३ मध्ये अखेरचं शतक झळकावलं होतं.
बेन स्टोक्सचं हे विक्रमी शतक ठरलं. ४२ वर्षांनी कसोटी क्रिकेटमधील एकाच सामन्यात कोणत्या कर्णधाराने पाच विकेट्स आणि शतक केलं आहे. याआधी १९८३ मध्ये इमरान खानने हा कारनामा केला होता. याशिवाय बेन स्टोक्स हा एकाच सामन्यात शतक आणि पाच विकेट्स घेणारा पहिलाच इंग्लंडचा कर्णधार आहे.
एका कसोटी सामन्यात शतक आणि ५ विकेट घेणारे कर्णधार
डेनिस एटकिन्सन (वेस्ट इंडिज) वि. ऑस्ट्रेलिया, ब्रिजटाऊन, १९५५
गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज) वि. इंग्लंड, लीड्स, १९६६
मुश्ताक मोहम्मद (पाकिस्तान) वि. वेस्ट इंडिज, पोर्ट ऑफ स्पेन, १९७७
इमरान खान (पाकिस्तान) वि. भारत, फैसलाबाद, १९८३
बेन स्टोक्स (इंग्लंड) वि. भारत, मँचेस्टर, २०२५