Shreyas Iyer Captaincy: येत्या ९ सप्टेंबरपासून आशिया चषक २०२५ स्पर्धेची सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात श्रेयस अय्यरची निवड केली गेली नव्हती. आयपीएल गाजवली, देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली तरीसुद्धा त्याला आधी इंग्लंड दौऱ्यासाठी स्थान दिलं गेलं नव्हतं. आता आशिया चषक स्पर्धेसाठीही त्याची निवड केली गेली नव्हती. या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण आता त्याला थेट संघाचा कर्णधार बनवण्यात आलं आहे.

येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया अ संघ मल्टी डे सामन्याच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी ध्रुव जुरेलकडे सोपवली गेली आहे. याआधी श्रेयस अय्यरने कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून दिलं होतं. २०२५ मध्ये झालेल्या हंगामात त्याने पंजाब किंग्ज संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं होतं. त्याने नेतृत्वात आणि फलंदाजीतही दमदार कामगिरी केली, या कामगिरीचं फळ त्याला मिळालं आहे

या मालिकेतील पहिला सामना १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना २३ सप्टेंबरपासून सुरू होईल. भारतीय अ संघात साई सुदर्शन, प्रसिध कृष्णा आणि देवदत्त पडिक्कल यांना देखील स्थान देण्यात आलं आहे.

मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल केला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील अनुभवी खेळाडू केएल राहुल आणि मोहम्मद सिराज यांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. हे दोन्ही खेळाडू आल्यानंतर पहिल्या सामन्यासाठी निवडण्यात आलेल्या दोन खेळाडूंना बाहेर केलं जाईल. हे दोन्ही सामने लखनऊच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत.

या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारतीय अ संघ :

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, एन जगदीसन (यष्टिरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), देवदत्त पडिक्कल, हर्ष दुबे, आयुष बदोनी, नितीश कुमार रेड्डी, तनुष कोटियन, प्रसिध कृष्णा, गुरनूर बराड, खलील अहमद, मानव सुथार, यश ठाकुर