|| अन्वय सावंत

फिरकीपटू राधा यादवला विश्वास

मुंबई : ऑस्ट्रेलियात होत असलेल्या महिला बिग बॅश लीग (डब्ल्यूबीबीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्याचा अनुभव भारतीय खेळाडूंना एकदिवसीय विश्वचषकासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल, असा विश्वास भारताची डावखुरी फिरकीपटू राधा यादवने व्यक्त केला.

पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चदरम्यान न्यूझीलंडमध्ये महिला एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे. ‘‘खेळाडूंना ‘डब्ल्यूबीबीएल’मधील अनुभव विश्वचषकासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. या स्पर्धेत जगभरातील आघाडीच्या महिला क्रिकेटपटू खेळतात,’’ असे राधा म्हणाली.

राधा ‘डब्ल्यूबीबीएल’मध्ये सिडनी सिक्सर्स संघाचे प्रतिनिधित्व करत असून या संघात ऑस्ट्रेलियाची प्रमुख अष्टपैलू एलिस पेरी आणि यष्टिरक्षक एलिसा हिली यांचाही समावेश आहे. ‘‘पेरी आणि हिली या महान खेळाडू आहेत. सराव सत्रात आणि सामन्यांमध्ये मी त्यांच्याकडून जास्तीतजास्त गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्यासोबत खेळण्याची संधी मिळत असल्याने मी भाग्यवान आहे,’’ असे राधाने सांगितले.