आयपीएल २०२६ स्पर्धेआधी राजस्थान रॉयल्स संघाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपासून संघाचा कर्णधार संजू सॅमसन संघाची साथ सोडून चेन्नई सुपर किंग्जकडे जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता राजस्थान रॉयल्स संघाला सर्वात मोठा धक्का बसला आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांनी राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती. पण एकाच वर्षात त्यांनी या संघाची साथ सोडली आहे.

राहुल द्रविड यांनी याआधी देखील राजस्थान रॉयल्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली होती. २०२४ मध्ये ते पुन्हा एकदा या पदावर परतले होते. मात्र या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. संजू सॅमसन देखील काही सामने दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रियान परागकडे सोपवण्यात आली होती. मात्र, राजस्थानचा संघ गुणतालिकेत ९ व्या स्थानी होता. आता राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राहुल द्रविड यांचे आभार मानले आहेत. या पोस्टला कॅप्शन देत त्यांनी लिहिले की, “गुलाबी जर्सीत तुम्ही नेहमीच युवा आणि अनुभवी खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरले.”

राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने २०२४ मध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला होता. या स्पर्धेनंतर त्यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला होता. ६ सप्टेंबर २०२४ ला राजस्थान रॉयल्सने त्यांची संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. युवा खेळाडूंना घडवण्यात राहुल द्रविड यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी याआधी भारतीय १९ वर्षांखालील संघाला देखील प्रशिक्षण दिलं आहे.

राजस्थान रॉयल्सची राहुल द्रविड यांच्यासाठी खास पोस्ट

राजस्थान रॉयल्सने राहुल द्रविडसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की,” राहुल द्रविड हे गेल्या कित्येक वर्षांपासून रॉयल्सच्या प्रवासाचे केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यांच्या नेतृत्वाने एका संपूर्ण पिढीला दिशा देण्याचं काम केलं आहे. द्रविड यांना मोठ्या पदाची ऑफर देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती ऑफर नम्रपणे नाकारली. त्यांनी संघासाठी दिलेल्या योगदानाबद्दल फ्रेंचायझी, खेळाडू आणि चाहत्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.” आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघ नव्या मुख्य प्रशिक्षकाची नियुक्ती करू शकतो.