Heinrich Klaasen Announced Retirement: आयपीएल २०२५ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. ३ जूनला या स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर इंग्लंडमध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या सामन्यात गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेचा सामना करणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिका संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा विस्फोटक फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्लासेनने वयाच्या ३३ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी त्याने ८ जानेवारी २०२४ ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने टी-२० वर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. यासह वनडे क्रिकेटमध्येही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला होता. आता सोमवारी (२ जून) त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत निवृत्ती घेत असल्याची माहिती दिली आहे.
हेनरिक क्लासेनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करणं हा माझ्यासाठी खूप दु:खद दिवस आहे. भविष्यात माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी काय चांगलं आहे, हे ठरवण्यासाठी मला बराच वेळ लागला. हा निर्णय घेणं खूप कठीण होतं, पण हा निर्णय घेणं गरजेचं होतं. देशाचं प्रतिनिधित्व करणं हा माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान होता. मी लहानपणी देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली.
हेनरिक क्लासेनची कारकिर्द
हेनरिक क्लासेनने काही दिवसांपूर्वीच आयपीएल २०२५ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळताना शानदार शतकी खेळी केली होती. त्याच्या आयपीएल स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलायचं झालं. तर त्याने ४९ सामन्यांमध्ये १४८० धावा केल्या आहेत. यादरम्यान १०५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्याला कसोटी कारकिर्दीत ४ सामने खेळण्याची संधी मिळाली.
यादरम्यान त्याला १०४ धावा करता आल्या. तर वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ६० सामन्यांमध्ये २१४१ धावा केल्या. यादरम्यान त्याने ११ अर्धशतकं आणि ४ शतकं झळकावली. तर टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ५८ सामन्यांमध्ये १००० धावा केल्या.