ICC Took Action On Nonkululeko Mlaba: आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाने २५१ धावा केल्या होत्या. या धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी पूर्ण जोर लावला. पण शेवटच्या ४ षटकात सामना फिरला. दक्षिण आफ्रिकेकडून ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या क्लार्कने दमदार खेळी करून दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला. दरम्यान या सामन्यानंतर आयसीसीने दक्षिण आफ्रिका संघातील फिरकी गोलंदाज नॉनकुलुलेको मलाबावर कारवाई केली आहे.
नेमकं कारण काय?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात १७ वे षटक टाकण्यासाठी नॉनकुलुलेको मलाबा गोलंदाजीला आली होती. त्यावेळी हरलीन देओल स्ट्राईकवर होती. नॉनकुलुलेको मलाबाच्या गोलंदाजीवर हरलीन देओल बाद होऊन माघारी परतली. बाद केल्यानंतर तिने सेलिब्रेशन करताना हरलीन देओलला टाटा बाय बायचा इशारा केला होता. हे आयसीसीला वादग्रस्त वाटलं. त्यामुळे आयसीसीने तिच्यावर कारवाई केली आहे. यासह तिला १ डिमेरिट पॉईंट देखील दिला आहे.
आयसीसीने प्रेस रिलीज शेअर केली आहे. या रिलीजमध्ये नॉनकुलुलेको मलाबावर कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. नॉनकुलुलेको मलाबाने आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केले आहे.हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान फलंदाज बाद झाल्यानंतर अपमानकारक भाषा, हावभाव आणि कृती करण्याशी संबधित आहे.
दक्षिण आफ्रिकेचा दमदार विजय
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला सुरूवातीला मोठे धक्के बसले होते. पण शेवटी ऋचा घोषने ९४ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने ४९.५ षटकांअखेर २५१ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेकडून डे क्लार्कने नाबाद ८४ धावांची खेळी केली. तर लॉरा वॉल्डवॉर्टने ७० धावांची खेळी केली. यासह दक्षिण आफ्रिकेने हा सामना ३ गडी राखून आपल्या नावावर केला.