Washington Sundar Injury: भारतीय संघाने पाकिस्तानला अंतिम फेरीत पराभूत करून आशिया चषकाची ट्रॉफी उंचावली आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर कसोटी संघाचा भाग नसलेले सर्व खेळाडू मायदेशी परतले आहेत. तर कसोटी संघाचा भाग असलेले खेळाडू पहिल्या कसोटीचा सराव करण्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झाला आहेत. भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना २ ऑक्टोबरपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे.
भारत आणि वेस्टइंडिज या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सरावादरम्यान वॉशिंग्टन सुंदरच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. बोटाच्या दुखापतीमुळे तो सराव करू शकला नाही. कर्णधार गिल आणि संघातील इतर खेळाडू देखील त्याची विचारपूस करताना दिसून आले. काही वेळाने तो पुन्हा गोलंदाजी करताना दिसून आला. पण गोलंदाजी करताना त्याला वेदना होत होत्या.
सुंदर खेळणार का?
सुंदरची दुखापत किती गंभीर आहे, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे तो खेळणार की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र माध्यमातील वृत्तानुसार, तो वेदनने कळवळताना दिसून आला. त्यामुळे टीम मॅनेजमेंट त्याच्याबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. वॉशिंग्टन सुंदर संघात असणं खूप महत्वाचं आहे. कारण न्यूझीलंडविरूद्ध मायदेशात झालेली कसोटी मालिका असो किंवा इंग्लंड दौरा असो, या दोन्ही मालिकांमध्ये त्याने अष्टपैलू कामगिरी करून संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे. जर दुखापतीमुळे तो पहिला कसोटी सामना खेळू शकला नाही,तर त्याच्या जागी डावखुऱ्या हाताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलला संधी दिली जाऊ शकते. अक्षर पटेल देखील गोलंदाजीसह फलंदाजीत योगदान देऊ शकतो.
युवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने दमदार कामगिरी केली होती. ५ कसोटी सामन्यांची मालिका २-२ ने बरोबरीत राहिली होती. वेस्टइंडिजविरूद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका झाल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ही मालिका झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे येणारे काही महिने शुबमन गिलसाठी कर्णधार म्हणून अतिशय महत्वाचे असणार आहेत.