Arundhati Reddy Injury: येत्या ३० सप्टेंबरपासून भारतात आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेला सुरूवात होण्याआधी सराव सामन्यांना सुरूवात झाली आहे. दरम्यान भारती संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंडविरूद्धच्या सराव सामन्यादरम्यान भारताची स्टार खेळाडू अरूंधती रेड्डी दुखापतग्रस्त झाली आहे. दुखापत इतकी गंभीर होती की,तिला व्हिलचेअरच्या साहाय्याने मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आलं. अरूंधती रेड्डी ही भारतीय संघातील स्टार गोलंदाज आहे. वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात होण्याआधी अरूंधती रेड्डी दुखापतग्रस्त होणं हा भारतीय संघासाठी सर्वात मोठा धक्का आहे.
भारतीय संघाचा पहिला सामना ३० सप्टेंबरला श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा सराव सामना ८ इंग्लंडविरूद्ध पार पडला. तर झाले असे की,इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना अरूंधती रेड्डी गोलंदाजी करत होती. अरूंधती रेड्डीने टाकलेल्या चेंडूवर इंग्लंडच्या फलंदाजाने समोरच्या दिशेने फटका मारला. अरूंधती रेड्डीने झेल घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिचा तोल गेला. तिला इतक्या वेदना होत होत्या की, ती स्वत:च्या पायावर देखील उभी राहु शकत नव्हती. फिजिओने त्वरीत मैदानात धाव घेतली. बराच वेळ तिच्यावर उपचार सुरू होते. पण ती स्वत:च्या पायावर उभी राहु शकली नसल्याने तिला व्हिलचेअरच्या साहाय्याने मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आलं.
अरूंधती रेड्डी वर्ल्डकप खेळणार का?
याी गंभीर दुखापतीनंतर अरूंधती रेड्डी वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसणार का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. अरूंधती रेड्डी ही प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. दुखापत झाल्यानंतर तिला फार वेदना होत असल्याचं दिसून येत होतं. ही दुखापत किती गंभीर आहे, हे स्कॅन केल्यानंतर कळेल. लवकरच तिच्या खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेला ३० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघ पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा सामना करणार आहे. भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हनमनप्रीत कौरकडे आहे. भारतीय संघ स्पर्धेतील दुसऱ्या लढतीत पाकिस्तानचा सामना करणार आहे. हा सामना ५ ऑक्टोबरला रंगणार आहे. तर स्पर्धेतील तिसऱ्या लढतीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेसोबत भिडणार आहे. तर ९ ऑक्टोबरला होणाऱ्या चौथ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहेत. तर १२ ऑक्टोबरला भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरूद्ध होणार आहे.