बिहारमधील मधुबनी जिल्ह्यामधील एका नाभिकाला इंडियन प्रिमियर लीगच्या कालावधीत खेळण्यात येणाऱ्या ड्रीम टीम स्पर्धेमध्ये तब्बल एक कोटींचा जॅकपॉट लागलाय. मधुबनीमधील अंधारथंडी ब्लॉकमधील नानौर चौकामध्ये छोटं केशकर्तनालय चालवणाऱ्या अशोक कुमारला हे बक्षिस मिळालं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्सदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये अशोकने ५० रुपय खर्च करुन आपली ड्रीम ११ टीम निवडली होती. या सामन्यासाठी अशोकने निवडलेले दोन्ही संघांमधील सर्वच खेळाडू उत्तम खेळले आणि अशोकला जॅकपॉट लागला. रविवारी अशोकला विजेता म्हणून घोषित करण्यात आलं.
ड्रीम ११ ही एक ऑनलाइन स्पर्धा आहे. यामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येकाला सामना सुरु होण्याआधी दोन्ही संघांमधील २२ खेळाडूंपैकी ११ खेळाडूंची निवड करुन आपला संघ बनावयचा असतो. एखाद्या स्पर्धकाने निवडलेल्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली तर त्यांना चांगले गुण मिळतात. याच गुणांच्या आधारे सामना संपल्यानंतर विजेता घोषित केला जातो.
“सामना संपल्यानंतर मी पहिल्या स्थानावर होतो आणि मला एक कोटींचं बक्षीस मिळालं. त्यानंतर मला ड्रीम ११ कडून फोन आला. त्यांमी मला पुढील दोन तीन दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर कर वजा करुन ७० लाख रुपये जमा केले जातील असं सांगितलं. मला त्या रात्री खरोखरच झोप लागली नाही,” असं अशोकने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
अशोक फार पूर्वीपासूनच मोबाईलवरुन या ड्रीम टीमच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत असल्याचं सांगतो. या पैशांमधून आपल्या कुटुंबावर असणारं कर्जाचं ओझं उतरवण्याबरोबर नवीन घर बांधण्याचा अशोकचा विचार आहे.
“मी ५० रुपये प्रवेश शुल्क भरुन चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्समधून माझा संघ निवडला होता. मी एवढा नशीबवान ठरेल असं मला वाटलं नव्हतो. सामना संपला तेव्हा मी निवडलेल्या संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने माझा थेट पहिला क्रमांक आला. खरं तर या खेळाडूंमुळेच मला एक कोटी रुपयांचं बक्षिस मिळालंय,” असं अशोक सांगतो.
“मी आता जे काम करतोय ते मला फार आवडतं. मी भविष्यातही हेच काम करत राहणार आहे. सध्या कर्ज फेडून नवीन घर बांधण्याला माझं प्राधान्य आहे,” असं अशोक म्हणाला. आयपीएल २०२१ चं उर्वरित पर्व सध्या युएईमध्ये सुरु असून या स्पर्धेमधील चुरस वाढली आहे. चौथ्या स्थानासाठी चार संघांमध्ये स्पर्धा सुरुय.