सचिन तेंडुलकरला देव मानणाऱ्या, त्याचे सामने पाहण्यासाठी सातासमुद्रापार पोहोचलेल्या फॅन सुधीर कुमारला बिहारमध्ये पोलिसांनी बेदम मारहाण केली आहे. हे प्रकरण मुझफ्फरपूर जिल्ह्याशी संबंधित आहे. सुधीर कुमारला पोलीस ठाण्यात एका पोलिसाने मारहाण केली. विशेष म्हणजे या पोलीस ठाण्याचे उदघाटन सुधीरच्या हस्ते करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, या पोलीस स्टेशनमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याने सुधीर कुमारला शिवीगाळ आणि मारहाण केली. सुधीरचा भाऊ किशन कुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. हा प्रकार कळताच सुधीरने पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी सुधीरचा चुलत भाऊ किशन कुमारला तुरुंगात बंद केले होते. हे पाहून सुधीर आपल्या भावाकडे गेला आणि त्याच्याशी संवाद साधू लागला. एका पोलिसाच्या हे निदर्शनास येताच त्याने सुधीरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सुधीरने यावर विरोध करताच त्या पोलिसाने मारहाण करत सुधीरला पोलीस स्टेशनमधून हाकलून लावले.
हेही वाचा – VIDEO : ५ षटकार अन् ९ चौकार..! २००च्या स्ट्राइक रेटनं घोगावलं युसुफ पठाणचं वादळ; भारताला मिळवून दिला विजय!
याप्रकरणी सुधीर कुमार म्हणाला, ”काही वर्षांपूर्वी ही पोलीस ठाण्याची इमारत नवीन असताना त्याचे उद्घाटन करण्यासाठी सेलिब्रिटी म्हणून बोलावले होते, हे माझे दुर्दैव आहे. त्याचे उद्घाटनही त्यांनी फीत कापून केले होते, मात्र आज त्याच पोलीस ठाण्यात मला मारहाण करण्यात आली आहे. माझ्यासोबत अशी घटना घडू शकते, तेव्हा पोलीस सर्वसामान्यांशी कसे वागत असतील, हे विचारात घेण्यासारखे आहे.”