ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झालेल्या स्टीव्ह स्मिथच्या पत्रकार परिषदेची चर्चा सध्या क्रीडा विश्वात होत आहे. बॉल टॅम्परिंग म्हणजेच सामन्यादरम्यान चेंडू कुरतडण्याची रणनिती आखल्यामुळे त्याच्यावर हे संकट ओढावलं. मुळात ही रणनिती रचल्याची कबुली स्टीव्हने दिल्यानंतर क्रिकेट विश्वाला एक हादराच बसला. ज्यानंतर अनेकांनीच याविषयी आपली मतं मांडण्यास सुरुवात केली.

कोणी स्टीव्हची चुक झाल्याचं मत मांडलं, तर कोणी हा क्रिकेट विश्वासाठी एक काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली. या साऱ्यामध्ये आता कलाविश्वातूनही काही सेलिब्रिटींनी आपली मतं मांडण्यास सुरुवात केली आहे. बॉल टॅम्परिंग प्रकरणी स्टीव्ह स्मिथने घेतलेल्या पत्रकार परिषदेच्याच दुसऱ्या दिवशी अभिनेता रितेश देशमुख याने एक ट्विट करत या माध्यमातून स्टीवच्या दृष्टीने एक महत्त्वाचं असं ट्विट केलं आहे.

‘जो माफ़ी माँगे वो बहादुर,
जो क्षमा करे वो दिलदार।
खेल हमेशा खिलाड़ी से बड़ा होता है।
स्टीव स्मिथ एक उमदा खिलाड़ी है, एक साल बाद उन्हें फिरसे मैदान में खेलते हुए देखना पसंद करूँगा।’, असं त्याने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

खेळ हा नेहमीच कोणत्याही खेळाडूपेक्षा मोठा असतो असं म्हणत स्टीव्ह एक प्रतिभावान खेळाडू असल्याचं मत त्याने मांडलं आहे. त्यामुळे स्मिथ सध्या बऱ्याच अडचणींचा सामना करत असला तरीही काही चाहत्यांची त्याला असणारी साथ पाहता ही एक गोष्ट त्याचा पाठबळ देणारी आहे असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : फ्लॅशबॅक : माधुरीचे ‘एक दो तीन…’ कायम १ नंबर

दरम्यान, स्टीव्हने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर सोशल मीडियावर अनेकांनीच पुन्हा या विषयीच्या चर्चा सुरु केल्या. बॉल टॅम्परिंग प्रकरणी स्टीव्हने क्रीडाप्रेमींची माफी मागितली होती. यावेळी त्याच्या भावनानांचा बांध फुटल्याचं पाहायला मिळालं. कर्णधार म्हणून आपण चुकीचा निर्णय घेतल्याचं तो म्हणाला. माझं क्रिकेटवर प्रेम असून यातून बाहेर पडू असा विश्वासही त्याने व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं.