सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगदरम्यान काही बुकींनी दोन क्रिकेटपटूंशी संपर्क साधला होता. आता हे प्रकरण भ्रष्टाचार विरोधी आणि सुरक्षा पथकाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे, असा गौप्यस्फोट बीसीसीआयचे प्रभारी अध्यक्ष सुनील गावस्कर यांनी केला आहे.
‘‘ब्रेंडन मॅक्क्युलमशी बुकींनी संपर्क साधण्याचे प्रकरण काहीसे चिंताजनक असले तरी याबाबतची कोणतीही माहिती उघड झालेली नाही. बुकींनी संपर्क साधल्यानंतर काय करावे, हे क्रिकेटपटूंना कळत नाही. भ्रष्टाचार विरोधी पथकाचे मोबाईल नंबर क्रिकेटपटूंना दिले जातात. पण आपला नंबर त्यांच्या रडारवर येईल, अशी भीती त्यांना असते. आता या वर्षीपासून प्रत्येक संघासोबत एकात्मता अधिकारी असल्यामुळे खेळाडूंना अशा प्रकरणी संवाद साधणे सोपे झाले आहे. आता बुकींनी संपर्क साधल्यावर या अधिकाऱ्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती द्यावी, त्यानंतर ते अधिकारी आपले काम पार पाडतील,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.