देशाच्या पदकविजेत्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेले कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांची सध्या चौकशी चालू आहे. केंद्र सरकारने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बॉक्सर मेरी कोम हिच्या नेतृत्वाखालील समितीची नियुक्ती केली आहे. या समितीसमोर ब्रिजभूषण सिंग यांनी गेल्या महिन्यात आपली बाजू मांडली आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रामधून ब्रिजभूषण सिंह यांच्या जबाबासंदर्भात अनेक खुलासे समोर येत आहेत. त्यात ब्रिजभूषण यांनी केलेल्या काही अजब दाव्यांचाही समावेश आहे.
महिला कुस्तीपटू आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी काही महिने केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अखेर केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या. त्यात चौकशी समितीमार्फत या सर्व प्रकरणाचा सखोल तपास करण्याच्या मागणीचाही समावेश होता. या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर त्याचा समावेश दिल्ली पोलिसांनी आपल्या आरोपपत्रामध्ये केला आहे. यामद्ये ब्रिजभूषण सिंह यांच्या तब्बल २४ पानी जबाबाचाही समावेश आहे.
“लखनौमध्ये कॅम्प आयोजित करायला मी सांगितलं नाही”
६ मे रोजी ब्रिजभूषण सिंह यांनी या समितीसमोर त्यांच्यावरील काही आक्षेपांना उत्तरं दिली. यात महिला व पुरुष कुस्तीपटूंचे कॅम्प स्वतंत्र लावण्याच्या मुद्द्यावर ब्रिजभूषण सिंह यांनी समितीसमोर मुद्दे मांडले. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
“मी प्रशासनाला हे अजिबात सांगितलं नाही की तुम्ही कुस्तीपटूंसाठी लखनौमध्ये शिबिराचं आयोजन करा. मी त्यांना सांगितलं की महिला व पुरुष कुस्तीपटूंसाठी स्वतंत्र शिबिरांची योजना करा. या कुस्तीपटूंच्या पालकांनीही मला हेच सांगितलं होतं”, असं ब्रिजभूषण म्हणाले. दरम्यान, यासंदर्भात स्वत: कुस्तीपटूंचं मत विचारात का घेतलं नाही? आखाड्यांमध्ये तर त्यांचं एकत्रच प्रशिक्षण होतं. विदेशातही असंच होतं, अशी विचारणा समितीकडून करण्यात आल्यानंतर त्यावर ब्रिजभूषण सिंह यांनी थेट शास्त्रांचा आधार घेतला.
“असं विदेशात होत नाही. मला सांगा, तरुण भाऊ-बहीण एकत्र का नाही झोपू शकत? हे महिला विद्यापीठ, महिला महाविद्यालय का आहेत? आपल्या शास्त्रांमध्येही म्हटलं गेलंय की बहीण-भावाने एकत्र एकांतात राहू नये. आता मी हे सांगितलंय तर त्यावर फार मोठा वाद होईल”, असं ब्रिजभूषण सिंह आपल्या जबाबात म्हणाले आहेत.
तक्रार समिती का नाही?
दरम्यान, सरकारच्या नियमानुसार ब्रिजभूषण सिंह यांनी लैंगिक शोषणासंदर्भातल्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी तक्रार समिती का गठित केली नाही? अशी विचारणा चौकशी समितीनं केली असता त्यावर ब्रिजभूषण यांनी आत्तापर्यंत कोणत्याही मुलीनं तशी तक्रारच केलेली नाही, असं उत्तर दिलं.
“मी हे मान्य करतो की समिती गठित करण्यासंदर्भात जे करायला हवं होतं, ते मी केलं नाही. पण आता मी ते करेन. जेव्हा केव्हा असं काही घडतं, तेव्हा हे मुद्दे उपस्थित केले जातात”, असं ब्रिजभूषण सिंह म्हणाले.