India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७१ धावांचे आव्हान ठेवले आहे. सामन्यातील चौथ्या दिवशी भारतीय संघाचा दुसरा डाव ३६४ धावांवर आटोपला. भारतीय संघाला आणखी मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. मात्र भारतीय संघाचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. प्रसिद्ध कृष्णा हा भारतीय संघाकडून बाद होणारा शेवटचा फलंदाज ठरला.
भारतीय संघाला या डावात हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. यशस्वी जैस्वाल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर गिल देखील स्वस्तात माघारी परतला. या डावात ऋषभ पंत आणि केएल राहुल यांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी १९५ धावा जोडल्या. ज्यावेळी हे दोन्ही फलंदाज फलंदाजी करत होते, त्यावेळी भारतीय संघ ४०० धावांच्या पार जाणार असं वाटलं होतं. मात्र ऋषभ पंत बाद झाल्यानंतर, एकापाठोपाठ एक विकेट्सची रांग लागली.
भारतीय संघाचा डाव आटोपल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, इंग्लंडच्या खेळाडूने प्रसिद्ध कृष्णाला षटकार मारण्यासाठी प्रवृत्त केलं. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि झेलबाद होऊन माघारी परतला.
तू षटकार मारू शकतो का?
प्रसिद्ध कृष्णा फलंदाजी करत असताना हॅरी ब्रुकने प्रसिद्ध कृष्णाला विचारले की, ” तू षटकार मारू शकतो का?” हॅरी ब्रुक प्रसिद्ध कृष्णाला मोठा फटका खेळण्यासाठी प्रवृत्त करत होता. त्याने पुढच्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि तो बाद होऊन माघारी परतला.
पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही भारतीय संघाने मोठी चूक केली. अवघ्या ३१ धावांवर भारतीय फलंदाजांनी ६ विकेट्स गमावल्या. जर भारतीय फलंदाज टिकून राहिले असते, तर संघाची धावसंख्या ४०० पार जाऊ शकली असती.
इंग्लंडची दमदार सुरूवात
इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी ३७१ धावांची गरज आहे. इंग्लंडकडून डावाची सुरुवात करताना बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १८८ धावा जोडल्या. इंग्लंडकडून जॅक क्रॉलीने ६५ धावांची खेळी केली. तर बेन डकेटने शतक पूर्ण केलं.