अल्वारो नेग्रेडोच्या शानदार हॅट्ट्रिकच्या जोरावर लीग चषक फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर सिटीने वेस्ट हॅमचा ६-० असा धुव्वा उडवला. या विजयासह सिटीचा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे.
 दुय्यम दर्जाच्या खेळाडूंसह खेळणाऱ्या वेस्ट हॅमला काही दिवसांपूर्वीच एफए चषकात नॉटिंगहॅम फॉरेस्ट संघाकडून ०-५ अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते. सिटीविरुद्धच्या लढतीत महत्त्वपूर्ण खेळाडू संघात दाखल झाल्यानंतरही वेस्ट हॅम संघाचे नशीब बदलू शकले नाही.
१२व्या मिनिटाला टौरूकडून मिळालेल्या पासच्या जोरावर नेग्रेडोने सलामीचा गोल केला. २६व्या मिनिटाला झेकोच्या पासवर गोलपोस्टच्या टोकावर शिताफीने चेंडू मारत गोल केला. याया टौरूने सुरेख गोल करत सिटीला ३-० अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर लगेचच नेग्रेडोने गोलची हॅट्ट्रिक पूर्ण केली. इडिन झेकोने दोन गोलसह सिटीला दणदणीत विजय मिळवून दिला.
मॅन्युअल पेलेग्रिनीच्या मँचेस्टर सिटीने यंदाच्या हंगामात घरच्या मैदानावर झालेल्या १५ लढतींमध्ये ५९ गोल केले आहेत. या दिमाखदार प्रदर्शनामुळे अंतिम लढतीत त्यांना स्थान मिळणे जवळपास निश्चित आहे.