एपी, पॅरिस
अलीकडच्या काळात संघर्ष करावी लागणारी इगा श्वीऑटेक आणि स्पेनचा कार्लोस अल्कराझ यांनी सोमवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या मोहिमेला विजयी सुरुवात करताना अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली.
चार वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारी श्वीऑटेक गतविजेतीदेखील आहे. विशेष म्हणजे सलग तीन वर्षे ती विजेती आहे. महिला एकेरीत या स्पर्धेत आतापर्यंत कुणीही चार विजेतीपदे मिळविलेली नाहीत. मोनिका सेलेस आणि जस्टिन हेनिन यांनीही येथे सलग तीन विजेतीपदे मिळविलेली आहेत. मात्र, सलग चौथ्या विजेतेपदापासून दोघीही वंचित राहिल्या. त्यामुळे या ऐतिहासिक कामगिरीकडे कूच करताना श्वीऑटेकने पहिल्या फेरीचा अडथळा १ तास २४ मिनिटांत पार केला. श्वीऑटेकने सेंटर कोर्टवर झालेल्या सामन्यात ४२व्या स्थानावरील रेबेका स्रामकोवाचा ६-३, ६-३ असा पराभव केला. विशेष म्हणजे श्वीऑटेक २०२४ मध्ये येथे विजेतेपद मिळविल्यापासून एकाही स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचलेली नाही. श्वीऑटेकची गाठ आता एमा रॅडुकानूशी पडणार आहे. रॅडुकानूने तीन सेटच्या लढतीत चीनच्या वँग शिन्यूचा प्रतिकार ७-५, ४-६, ६-३ असा मोडून काढला. महिला एकेरीतील अन्य सामन्यात एलिना रायबाकिनाने ज्युलिया रिएराचे आव्हान ६-१, ४-६, ६-४ असे मोडून काढले. नवव्या मानांकित एमा नवारोला मात्र पहिल्या फेरीत जेसिका मॅनेइरोकडून ०-६, १-६ असा पराभव पत्करावा लागला.
अल्कराझलाही विजयासाठी फार प्रयत्न करावे लागले नाहीत. अल्कराझने पात्रता फेरीतून आलेल्या इटलीच्या गिउलिओ झेपिएरीवर ६-३, ६-४, ६-२ असा विजय मिळवला. पुरुष एकेरीत चौथ्या मानांकित अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झला डॅनिए अल्टमेअरकडून ५-७, ६-३, ३-६, १-६ असा पराभव पत्करावा लागला. विसाव्या मानांकित ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने टोमास मार्टिन एचेवेरीचे आव्हान ७-५, ६-३, ६-४ असे संपुष्टात आणले. सातव्या मानांकित कॅस्पर रुडने पहिला अडथळा पार करताना अल्बर्ट रामोस विनोलासवर ६-३, ६-४, ६-२ असा विजय मिळविला.
मजा करतोय, पण टेनिस चुकवत नाही –नदाल
गेल्यावर्षी डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेनंतर टेनिसमधून निवृत्ती घेणाऱ्या राफेल नदालने आपल्या गौरव सोहळ्यात आता मजा करत आहे, पण टेनिस चुकवत नाही असे सांगितले.
फ्रेंच स्पर्धेत सर्वाधिक १४ विजेतीपदे मिळविल्यामुळे फ्रेंच टेनिस संघटनेच्या वतीने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नदालचा गौरव करण्यात आला. रॉजर फेडरर, अँडी मरे, नोव्हाक जोकोविच यांच्यासह फ्रेंच स्पर्धा संचालक अॅमेली मॉरेस्मो यांच्या उपस्थितीत हा गौरव सोहळा झाला, तेव्हा नदालला एकवेळ आपल्या भावनांना रोखता आले नाही.
‘‘माझे शरीर मला कोर्टवर येऊ देत नाही. हाच माझ्या सध्याच्या टेनिसचा आनंद घेण्यामधील फरक आहे. सर्वोत्तम कारकीर्द घडविण्यासाठी जेवढे करायचे तेवढे केले. आता कुटुंबियांच्या सान्निध्यात नवे आयुष्य घालवताना खूप मजा घेत आहे. हे आयुष्य टेनिस कारकीर्दीपेक्षा रोमांचक असेल, असेही नदाल म्हणाला.
‘‘टेनिस कारकीर्दीत जो काही आनंद मिळविला, त्याचा आनंद जीवनात इतर गोष्टींमध्ये शोधणे अशक्य आहे. पण, म्हणून हा आनंद कमी असेल असे होत नाही,’’ असेही त्याने सांगितले.
फ्रेंच स्पर्धेत चौदा विजेतीपदे मिळवून नदालने अनोखी कामगिरी केली. मात्र, नदालने आपण काही मोठे केले असे मानत नाही. हे घडण्यासाठी कारकीर्द दिर्घ असावी लागते. ती मला मिळाली. दुखापतीसारख्या असंख्य अडचणी वाटेत येऊ शकतात. अशा वेळी तुम्हाला नशीबाची गरज भासते व ती मला मिळाली, असे नदाल म्हणाला.
टेनिसशिवाय आयुष्य जगताना मला कशाची प्रेरणा मिळते याचा मी शोध घेत आहे – राफेल नदाल