भारतीय हॉकी संघाच्या सुमार कामगिरीने व्यथित झालेल्या माजी खेळाडू जोअ‍ॅकिम काव्‍‌र्हालो यांनी प्रशिक्षक मायकेल नॉब्स यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. नॉब्स यांनी प्रशिक्षक म्हणून दोन वर्षांच्या कालावधीत कोणतीही प्रभावी कामगिरी केलेली नाही. त्यांनी प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यापासून भारतीय संघाच्या कामगिरीत अजिबात सुधारणा झालेली नाही. विशिष्ट प्रतिस्पध्र्याविरुद्ध डावपेच आखणे हे चांगल्या प्रशिक्षकाचे काम असते. प्रशिक्षक उत्तम व्यवस्थापक असायला हवा आणि त्याचबरोबर त्याचा खेळाडूंशी सुसंवाद असायला हवा. खेळ समजून घेण्याची हातोटी त्याच्याकडे हवी. मात्र नॉब्स या सगळ्या आघाडय़ांवर अपयशी ठरले आहेत अशी खरमरीत टीका काव्‍‌र्हालो यांनी केली आहे.
 नेदरलॅण्ड्सचे ऑलिम्पिकपटू रोलँट ओल्टमन्स हे संघसंचालक पदावर कार्यरत आहे. नॉब्स यांच्यापेक्षा ओल्टमन्स अधिक सक्षम असताना त्यांच्याकडे प्रशिक्षकपद का नाही, असा सवालही काव्‍‌र्हालो यांनी केला आहे. नॉब्स यांना भक्कम आर्थिक पाठबळ मिळत आहे, भारताला विश्वचषकात थेट प्रवेश न मिळाल्यास हा सर्व पैसा वाया जाणार आहे.
मात्र त्याच वेळी काव्‍‌र्हालो यांचे संघसहकारी आणि माजी खेळाडू मव्‍‌र्हिन फर्नाडिस यांनी सातत्याने प्रशिक्षक बदलण्याच्या धोरणाला विरोध केला आहे. प्रशिक्षणाबाबत बोलण्यावर माझा विश्वास नाही. आपण एवढे बदल केले आहेत. अनेक भारतीय प्रशिक्षकांनंतर नॉब्स यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण या बदलाचा काय परिणाम झाला आहे?  कुठलाही बदल करण्याआधी आपल्याकडे त्यासाठी पर्याय आहे का याचा विचार आधी करायला हवा, असे फर्नाडिस यांनी सांगितले.
प्रशिक्षक खेळाडूंना ठरावीक मर्यादेपर्यंत मदत करू शकतात. प्रशिक्षकाला मर्यादा आहेत, खेळाडूंकडे मूलभूत कौशल्यांची वानवा आहे. चेंडूवर ताबा मिळवून, पास करण्यामध्ये आपले खेळाडू मागे पडत आहेत, असे फर्नाडिस यांनी सांगितले.
नॉब्स यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला लंडन ऑलिम्पिकमध्ये तळाच्या १२व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. पुढील वर्षी मे-जूनमध्ये हॉग, नेदरलॅण्ड्समध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र होण्याइतकी कामगिरी करवून घेण्याचे आव्हान नॉब्स यांच्यासमोर आहे. नुकत्याच झालेल्या जागतिक हॉकी लीग स्पर्धेतही भारतीय संघाची कामगिरी सुमार झाली होती. २४ ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या आशिया चषकाद्वारे विश्वचषकासाठी थेट पात्र होण्याची संधी भारतीय संघाला आहे. ही संधी वाया घालवल्यास नॉब्स यांचे पद धोक्यात येऊ शकते.

आशियाई संभाव्य हॉकी संघातून संदीपला डच्चू
नवी दिल्ली : मलेशिया येथे पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई हॉकी चषकासाठी भारताचा ४८ खेळाडूंचा संभाव्य संघ जाहीर करण्यात आला असून, त्यामधून ‘ड्रगफ्लिकर’ संदीप सिंगला डच्चू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संभाव्य संघाचे शिबीर १६ जुलै ते १६ ऑगस्टपर्यंत बंगळुरूमध्ये भरणार आहे. सध्याच्या वाईट फॉर्ममुळे त्याला संघातून काढून टाकल्याची चर्चा क्रिकेटवर्तुळात आहे.
भारताचा संभाव्य संघ
गोलरक्षक : पी.आर. श्रीजेश, पी.टी. राव, श्रीनिवास राव काथरू, जगदीप दयाल, अभिनय कुमार पांडे.
बचावरक्षक : व्ही.आर. रघुनाथ, रुपिंदर पाल सिंग, हरबीर सिंग संधू, अमित रोहिदास, संपत कुमार मयलाराम, गगनदीप सिंग, दयानंद चनमथाबम, नरिंदर पाल सिंग, गुरमेल सिंग.
मध्यरक्षक : सरदार सिंग, मनप्रीत सिंग, एम. बी. अयप्पा, कोथाजित सिंग, परदीप मोर, विवेक धर, बीरेंद्र लाक्रा, जयप्रीत सिंग, समिरनजीत सिंग, मनजीत कुल्लू, विकास पिल्ले, सुमित.
आघाडीपटू एस.व्ही. सुनील, गुरविंदर सिंग चंडी, चिंनग्लेन्सना सिंग, दानिश मुजताबा, एस. के. उथप्पा, प्रधान सोमण्णा, नितीन थिमाइया, धरमवीर सिंग, आकाशदीप सिंग, एम.जी. पोन्चा, प्रभदीप सिंग, पी.एल. थिमन्ना, गुरप्रीत सिंग, जसजीत सिंग, निकीन थिमाइया, सुखदेव सिंग, हरमनप्रीत सिंग, मनजिंदर सिंग, के. मुडाप्पा, गगनजीत सिंग.