शाहरुख खान याच्या ‘चक दे इंडिया’ या चित्रपटाने केवळ भारतामधीलच क्रीडा चाहत्यांना मंत्रमुग्ध केले नसून परदेशातील क्रीडा चाहत्यांनाही त्याची भुरळ घातली आहे. कतारमध्ये क्रीडाविषयक वातावरण निर्मिती करण्यासाठी तेथील क्रीडा संघटकांनी ‘चक दे इंडिया’मधील भारतीय संघ व कतारचा संघ यांच्यात हॉकीचा प्रदर्शनीय सामना गुरुवारी आयोजित केला आहे.
कतारमध्ये २०२२ची विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत कतारने विजेतेपद मिळवावे यासाठी आतापासून तेथे संघबांधणी व वातावरण निर्मिती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून अल रियान येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात ‘चक दे इंडिया’ संघाचा सामना होणार आहे. ज्येष्ठ ऑलिम्पिक हॉकीपटू मीर रंजन नेगी यांना या सामन्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. ‘चक दे इंडिया’ या चित्रपटनिर्मितीत नेगी यांनी निर्मिती व दिग्दर्शनात मदत केली होती.
या संदर्भात नेगी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले की, ‘‘कतारमध्ये राहणाऱ्या गुजराथी, हिंदी भाषिक तसेच काही मुस्लीम लोकांनी या चित्रपटाचा अनेक वेळा आनंद घेतला आहे. मस्कत येथील ऑलिम्पिक सल्लागार एस.व्ही.एस. नक्वी हे कतार ऑलिम्पिक संघटनेचे सल्लागार आहेत. २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये कतारच्या खेळाडूंची कामगिरी अव्वल दर्जाची व्हावी यासाठी आतापासूनच विविध सराव स्पर्धा, प्रशिक्षण शिबिरे यांचे नियोजन करण्यात आले आहे. कतारमधील खेळाडूंना प्रेरणा मिळावी यासाठी हा चित्रपट दाखविला जावा, तसेच या चित्रपटातील संघाबरोबर तेथील खेळाडूंचा सामना आयोजित केला जावा, अशी सूचना नक्वी यांनी कतार संघटनेस केली व ती त्यांनी तत्काळ मान्य केली.’’
कतारमध्ये जरी फुटबॉलची विश्वचषक स्पर्धा होणार असली तरी त्यांनी केवळ फुटबॉल नव्हे, तर अन्य खेळांचेही प्रदर्शनीय सामने आयोजित केले आहेत. त्यांनी पाकिस्तानचे ज्येष्ठ हॉकीपटू शहाबाज खान यांच्याबरोबरच पाकिस्तानच्या राष्ट्रीय हॉकी संघासही निमंत्रित केले आहे. त्यांचाही तेथे प्रदर्शनीय सामना होणार आहे. तसेच अन्य परदेशी ऑलिम्पिक हॉकीपटूंनाही तेथे निमंत्रित करण्यात आले आहे. या खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली तेथील स्थानिक प्रशिक्षकांकरिता उद्बोधक शिबिरही आयोजित करण्यात आले आहे.
याविषयी नेगी म्हणाले की, ‘‘‘चक दे इंडिया’ संघातील बॉलिवूड कलाकारांसहित सर्वच खेळाडूंना निमंत्रित करण्यात आले आहे. शिल्पा शुक्ला, शुभी मेहता, तानिया अबरोल यांच्यासह हा संघ बुधवारी कतारला रवाना होणार आहे. मी त्यांच्याबरोबरच जाणार आहे. तेथे या संघातील बॉलिवूड कलाकार व काही खेळाडूंच्या प्रकट मुलाखतीही घेतल्या जाणार आहेत.’’
शाहरुखचा सहभाग अनिश्चित
‘चक दे इंडिया’ चित्रपटात प्रशिक्षक कबीर खानची भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानला निमंत्रित करण्यात आले आहे काय, असे विचारले असता नेगी म्हणाले की, ‘‘त्यालाही या सामन्यासाठी निमंत्रित करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र चित्रपटांच्या चित्रीकरणात तो मग्न असल्यामुळे त्याला कतारमध्ये येणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.’’