Champions League Footbal म्युनिक : एरिक मॅक्सिम चौपो-मोटिंग आणि सर्ज गनाब्री यांनी केलेल्या गोलच्या जोरावर बायर्न म्युनिकने चॅम्पियन्स लीग फुटबॉलमधील उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात पॅरिस सेंट-जर्मेन संघाला २-० असे पराभूत केले. दोन लढतींमध्ये बायर्नने ही लढत ३-० अशा फरकाने जिंकत उपांत्यपूर्व फेरी गाठली.

लिओनेल मेसी आणि किलियन एम्बापेसारख्या तारांकित खेळाडूंचा सहभाग असलेल्या सेंट-जर्मेन संघाला चॅम्पियन्स लीगचे एकदाही जेतेपद मिळवता आले नसून बायर्नविरुद्धही त्यांनी निराशा केली. दुसऱ्या टप्प्यातील सामन्याच्या पहिल्या सत्रात आक्रमक खेळ करूनही सेंट-जर्मेनला बायर्नचा बचाव भेदता आला नाही. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता. दुसऱ्या सत्रात म्युनिकने आक्रमणाची गती वाढवली. ६१ व्या मिनिटाला आघाडीपटू चौपो-मोटिंगने गोल करत बायर्नला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर प्रतिहल्ला करताना गनाब्रीने (८९ व्या मि.) गोल झळकावत बायर्नची आघाडी दुप्पट केली. ही आघाडी अखेपर्यंत राखताना बायर्नने विजय नोंदवला. त्यापूर्वी, पहिल्या टप्प्यातील सामन्यात किंगस्ले कोमानच्या गोलमुळे बायर्नने १-० असा विजय मिळवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.