भारतीय फुटबॉलवर गोव्याचे वर्चस्व कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. गोव्याच्या चर्चिल ब्रदर्सने कोलकात्याच्या बलाढय़ मोहन बागानविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सोडवत आय-लीग फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या जेतेपदाला गवसणी घातली.
चर्चिल ब्रदर्सने २५ सामन्यांत ५२ गुण पटकावले आहेत. या जेतेपदासह चर्चिल ब्रदर्सने सात दशलक्ष डॉलरची कमाई केली. गेल्या काही वर्षांत भारतीय फुटबॉलवर असलेले कोलकाताचे वर्चस्व आता गोव्याकडे झुकू लागले आहे. गेल्या पाच वर्षांत गोव्याच्या चर्चिल आणि डेम्पोने प्रत्येकी दोन वेळा तसेच साळगांवकर क्लबने एकदा आय-लीगवर मोहोर उमटवली.
पुणे फुटबॉल क्लबला मागे टाकून जेतेपदावर नाव कोरण्यासाठी चर्चिल ब्रदर्सला हा सामना बरोबरीत सोडवायचा होता. मात्र सी. एस. सबीथ याने २६व्या मिनिटाला सुरेख कामगिरी करत मोहन बागानसाठी पहिला गोल केला. त्यानंतर भारताचा कर्णधार सुनील छेत्री याने दुसऱ्या सत्रात चर्चिल ब्रदर्सला बरोबरी साधून दिली. अखेर १-१ अशा बरोबरीनंतर चाहत्यांनी जल्लोषाला सुरुवात केली.