scorecardresearch

Video: “यांच्यापेक्षा गल्लीतरी पोरं बरी!” इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये संघ व्यवस्थापकांची एकमेकांना मारहाण

Chelsea vs Tottenham Hotspur: रविवारी इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये चेल्सी आणि टोटेनहॅम हॉटस्पर यांच्यात सामना खेळवण्यात आला.

Video: “यांच्यापेक्षा गल्लीतरी पोरं बरी!” इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये संघ व्यवस्थापकांची एकमेकांना मारहाण
फोटो सौजन्य – ट्विटर

युरोपमध्ये फुटबॉल प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या युरोपात विविध फुटबॉल स्पर्धांचा हंगाम सुरू आहे. यापैकी इंग्लिश प्रीमियर लीग ही सर्वात प्रसिद्ध फुटबॉल स्पर्धा आहे. रविवारी (१४ ऑगस्ट) या स्पर्धेत चेल्सी आणि टोटेनहॅम हॉटस्पर यांच्यात सामना खेळवण्यात आला. अतिशय रंगतदार झालेला हा सामना २-२ असा बरोबरीत सुटला. मात्र, सामन्यापेक्षा दोन्ही संघाच्या व्यवस्थापकांची जास्त चर्चा झाली.

चेल्सी आणि टोटेनहॅम हॉटस्पर सामन्यादरम्यान अँटोनियो कॉन्ट आणि थॉमस टशेल यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. खेळातील ६८व्या मिनिटापासून वादाची ठिणगी पडली होती. पंचानी फाउल न दिल्याचा फटका चेल्सीला सहन करावा लागला. टोटेनहॅमने सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. चेल्सीचे व्यवस्थापक थॉमस टशेल पंचाच्या या निर्णयावर संतापले होते. तर, टोटेनहॅमचे व्यवस्थापक अँटोनियो कॉन्ट आनंद साजरा करत होते. त्यावेळी दोघांनी एकमेकांवर शाब्दिक कुरघोडी केली.

त्यानंतर, ७७व्या मिनिटाला रीस जेम्सने चेल्सीला आघाडी दिल्यामुळे टोटेनहॅमचा आनंद अल्पकाळ टिकला. शेवटच्या काही मिनिटांपर्यंत सामना चेल्सीच्या ताब्यात असल्याचे दिसत होते. पण, ९६व्या मिनिटाला टोटेनहॅमने शानदार गोल करून २-२ अशी बरोबरी साधली. फुटबॉलमधील प्रथेनुसार सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या व्यवस्थापकांनी हात मिळवणे गरजेचे असते. त्यावेळी अँटोनियो कॉन्ट आणि थॉमस टशेल यांच्यात पुन्हा जोरदार वाद सुरू झाला.

हेही वाचा – Independence Day 2022: “भारत असा देश ज्याठिकाणी…”, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त वेस्ट इंडीजच्या माजी कर्णधाराचे ट्वीट चर्चेत

चेल्सीचा व्यवस्थापक थॉमस टशेलने कॉन्टच्या हाताला जोरदार हिसका दिला. त्यानंतर वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. दोन्ही व्यवस्थापकांना शांत करण्यासाठी खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. या वादामुळे सामनाधिकाऱ्यांनी दोघांनाही ‘रेड कार्ड’ दाखवले आहे. चेल्सी आणि टोटेनहॅम हॉटस्पर सामन्यात रंगलेल्या या नाट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या