या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अबू धाबी : रवींद्र जडेजाने (८ चेंडूंत २२) अखेरच्या षटकांत केलेल्या फटकेबाजीमुळे चेन्नई सुपर किंग्जने ‘आयपीएल’मध्ये रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सवर दोन गडी राखून निसटता विजय मिळवला. १० सामन्यांत या आठव्या विजयासह चेन्नईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.

कोलकाताने दिलेले १७२ धावांचे आव्हान चेन्नईने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. ऋतुराज गायकवाड (४०) आणि फॅफ डू प्लेसिस (४३) यांनी चेन्नईच्या डावाची उत्कृष्ट सुरुवात केली. आंद्रे रसेलने ऋतुराजला बाद करत ही जोडी फोडली. तर प्रसिद्ध कृष्णाने डू प्लेसिसला माघारी पाठवले. यानंतर मोईन अली (३२) वगळता मधली फळी अपयशी ठरल्याने चेन्नईला अखेरच्या दोन षटकांत २६ धावांची आवश्यकता होती. कृष्णाने टाकलेल्या १९व्या षटकात जडेजाने दोन चौकार आणि दोन षटकारांसह २२ धावा काढल्या. सुनील नरीनने अखेरच्या षटकात दोन गडी बाद केले. मात्र, शार्दूल ठाकूरच्या तीन धावा आणि अखेरच्या चेंडूवर दीपक चहरने एक धाव काढत चेन्नईला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, कोलकाताने २० षटकांत ६ बाद १७१ अशी धावसंख्या उभारली होती. शुभमन गिल (९) स्वस्तात बाद झाल्यावर राहुल त्रिपाठी (४५) आणि वेंकटेश अय्यर (१८) यांनी कोलकाताचा डाव सावरला. तसेच नितीश राणा (नाबाद ३७) आणि दिनेश कार्तिक (२६) यांनीही चांगली फलंदाजी केली.

रवींद्र जडेजा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai super kings jadeja ipl cricket abu dhabi ssh
First published on: 27-09-2021 at 00:30 IST