चेन्नई सुपर किंग्सने संघाने केलेला ट्रेड गेले काही महिने सगळ्यात चर्चेत होता. चेन्नईने सुपर किंग्सने त्यांचा संघाचा अविभाज्य भाग असलेला अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजाला राजस्थान रॉयल्सने ट्रेड केलं आहे. जडेजाच्या बरोबरीने अष्टपैलू सॅम करनही राजस्थानकडे जाणार आहे. या बदल्यात राजस्थानचा कर्णधार आणि विकेटकीपर संजू सॅमसन चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला आहे.

यंदाच्या हंगामानंतर संजूने राजस्थान रॉयल्स व्यवस्थापनाला रिलीज करावं अशी विनंती केली होती. दुखापतीमुळे संजू काही सामने खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी रियान परागने नेतृत्वाची धुरा सांभाळली. संजूचा फॉर्मही चांगला नव्हता. राजस्थानची कामगिरीही ढासळत गेली. राजस्थान आणि संजू यांच्यात बेबनाव असल्याच्या चर्चाही समोर आल्या. राजस्थान संघव्यवस्थापन नेतृत्वाची धुरा यशस्वी जैस्वाल किंवा रियान पराग यांच्याकडे सोपवण्यास उत्सुक असल्याचं दिसत होतं. या पार्श्वभूमीवर राजस्थानने संजूला रिलीज केलं. दुसरीकडे प्रमुख फिरकीपटू, उपयुक्त फलंदाज आणि अफलातून क्षेत्ररक्षक असलेला जडेजा हा चेन्नईच्या आधारस्तंभ खेळाडूंपैकी एक होता. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर जडेजाकडे नेतृत्व देण्यात आलं होतं. मात्र संघाची कामगिरी चांगली न झाल्याने जडेजाने नेतृत्व सोडून दिलं.

जडेजा २००८-०९ हंगामात राजस्थानकडून खेळला होता. राजस्थानने पहिल्यावहिल्या हंगामात जेतेपद पटकावलं होतं. जडेजा त्या संघाचा भाग होता. त्यानंतर चेन्नईवर बंदीची कारवाई झालेली असताना जडेजा गुजरात संघाकडून खेळला होता. ट्रेडच्या निमित्ताने जडेजाची राजस्थानकडे घरवापसी होत आहे.

ट्रेंट बोल्टला रिलीज केल्यानंतर राजस्थानला चांगल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची आणि बॅटिंग करू शकणाऱ्या गोलंदाजाची आवश्यकता होती. सॅम करनवर ही दुहेरी जबाबदारी असेल.

रवींद्र जडेजासारख्या आधारवड खेळाडूला ट्रेड करण्याचा निर्णय अतिशय कठीण होता असं चेन्नई सुपर किंग्सचे व्यवस्थापकीय संचालक काशी विश्वनाथन यांनी सांगितलं.

दरम्यान चेन्नईने सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा भरवशाचा सलामीवीर कॉनवे चेन्नईच्या योजनांचा भाग होता मात्र गेल्या काही हंगामात त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. चेन्नईने मथिशा पथिराणालाही रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. स्लिंगिंग अॅक्शन असलेला पथिराणा हा लसिथ मलिंगाचा आविष्कार मानला जातो. बुंध्यात यॉर्कर टाकून प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणण्यात पथिराणा तरबेज आहे. मात्र त्याच्या अॅक्शनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. पथिराणाला योग्य पद्धतीने हाताळले नाही तर दुखापतींची शक्यता आहे असं महेंद्रसिंग धोनी म्हणाला होता. पथिराणाची अचूकता कमी झाल्याचं मत चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी नोंदवलं होतं. पथिराणाला रिलीज केलं असलं तरी चेन्नईत लिलावात त्याला ताफ्यात दाखल करून घेऊ शकतात. दरम्यान पथिराणासंदर्भात चेन्नईने औपचारिक घोषणा केलेली नाही.