महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुखने आपल्या कारकीर्दीतील सर्वोच्च यश मिळवताना पहिल्यांदाच महिला विश्वचषक भारताकडे आणण्याची किमया केली. चुरशीने खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत दिव्याने भारताची दिग्गज खेळाडू कोनेरू हम्पीचा ‘टायब्रेकर’मध्ये १.५ विरुद्ध ०.५ असा पराभव केला. या विजयामुळे दिव्याला जागतिक संघटनेकडून ‘ग्रँडमास्टर’ हा बहुमानाचा किताबही मिळाला. जागतिक बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आणि रशियाचे माजी उपपंतप्रधान अर्कादी द्वोर्कोविच यांनी दिव्याचे सर्वांत आधी अभिनंदन केले. त्या वेळी दिव्याला आपले आनंदाश्रू आवरता येत नव्हते.
विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील जलदगतीने खेळल्या गेलेल्या टायब्रेकरला रोमहर्षक सुरुवात झाली, त्यावेळी हम्पीने आपल्या नेहमीच्या शैलीत खेळ केलाच नाही. जराही धोका न पत्करणारी आणि खंबीर मनाने कितीही कठीण परिस्थितीला सामोरी जाणारी ३८ वर्षांची हम्पी यावेळी मात्र विचलित झालेली दिसली. पहिल्या डावात वजिराचा बळी देऊन हम्पीने दिव्याला बरोबरीत रोखले, परंतु त्यामध्ये झालेली एक घोडचूक तिला महाग पडू शकली असती. दिव्याने चुकीचा शह दिल्यामुळे हम्पीचा पराभव टळला, पण हम्पी गांगरून गेली असावी. पहिला डाव ८१ खेळ्यानंतर बरोबरीत सुटला.
बोगो इंडियन प्रकाराने खेळल्या गेलेल्या दुसऱ्या डावात बरोबरीकडे डाव झुकत असताना अचानक हम्पीने पटाच्या मध्यातील प्यादे पुढे टाकण्याची घोडचूक केली. आता पारडे दिव्याच्या बाजूने झुकले होते. हम्पीकडे कमी वेळ होता आणि दिव्या सहज जिंकेल असे वाटत असताना दिव्याने हम्पीला पुनरागमनाची संधी दिली. वेळेअभावी जलद खेळणाऱ्या हम्पीला याचा फायदा घेता आला नाही आणि अखेर ७५ चालीनंतर हम्पीने आपला पराभव मान्य केला.
आनंदनंतर दिव्याच!
ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदनंतर विश्वचषक जिंकणारी दिव्या ही पहिलीच भारतीय आहे. आनंदने २००० आणि २००२ साली विश्वचषक जिंकला होता. महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट म्हणजे अवघ्या १९ वर्षांत दिव्याने राष्ट्रीय महिला, आशियाई महिला या अजिंक्यपदांपाठोपाठ आता महिला विश्वचषक जिंकून आपल्या प्रतिभेची साक्ष संपूर्ण जगाला दिली आहे. ती आता भारतीय महिलांमध्ये चौथी आणि भारताच्या यादीतील ८८वी ग्रँडमास्टर झाली आहे. दिव्या आणि हम्पी या दोघीही आता जागतिक महिला विश्वविजेतेपदाच्या ‘कँडिडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.
दिव्याचे आईवडील दोघेही स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत आणि विशेष म्हणजे दिव्याच्या आईने मुलीच्या बुद्धिबळासाठी आपल्या व्यवसायाचा त्याग केला आहे. बतुमी येथे दिव्याची आई सावलीसारखी तिच्याबरोबर होती.
दिव्याचा झंझावात
२०२२ साली वयाच्या १६व्या वर्षी राष्ट्रीय महिलांचे अजिंक्यपद मिळवणाऱ्या दिव्याने पुढच्याच वर्षी कझाखस्तानमधील अल्माटीमध्ये आशियाई महिलांचे अजिंक्यपद मिळवून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची मुहूर्तमेढ रोवली. तशी तिने जागतिक ज्युनियर स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णांची कमाई केली होतीच. नंतर झालेल्या २०२२ आणि २०२४ च्या ऑलिम्पियाडमध्ये तिने एकूण तीन सुवर्णपदके मिळवून भारताच्या यशात मोठा वाटा उचलला होता.
चिनी खेळाडूंविरुद्ध तर दिव्याइतके यश जगात इतर कोणाही खेळाडूला मिळाले नसावे. तिच्यापेक्षा ५५० गुण वरचढ झू जिनेरविरुद्धच्या विजयामुळे भारतीय संघ २०२० च्या ऑनलाइन ऑलिम्पियाडमध्ये उपांत्य फेरीत पोहचू शकला होता. जगज्जेत्या जू वेन्जूनच्या उपस्थितीत दिव्याने कोलकाता येथील टाटा स्टील जलदगती स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवून सगळ्यांना थक्क केले होतेच. आता विश्वचषकात तर तिने झू जिनेरपाठोपाठ माजी जगज्जेत्या टॅन झोंगयीला पण पराभूत केले.
याच वर्षी जगातील पहिल्या क्रमांकाची महिला खेळाडू हू यिफान हिला हरवणाऱ्या दिव्याकडून आता जगज्जेतेपदाच्या अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नसावी.
(लेखक द्रोणाचार्य पुरस्कार विजेते बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत.)