Chris Gayle Accuses Punjab Kings of Disrespect: आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम नावे असलेला ख्रिस गेलने त्याच्या आयपीएल कारकीर्दीच्या अखेरच्या वर्षांतील अनुभवाबाबत मोठा खुलासा केला आहे. ख्रिस गेलने एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला की जेव्हा तो पंजाब किंग्ज (PBKS) चा भाग होता तेव्हा फ्रँचायझीमध्ये त्याचा अनादर करण्यात आला होता. यामुळेच तो मानसिकदृष्ट्या खचला आणि नैराश्यात पोहोचला.
आपल्या वादळी फलंदाजीने सर्वांना चकित करणारा आणि गोलंदाजीत विकेट्स चटकावणाऱ्या गेलने केलेल्या खुलासामुळे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनलवरील संभाषणादरम्यान सांगितलं की, २०२१ च्या हंगामात त्याला फ्रँचायझीमध्ये आदर मिळाला नाही.
२०२१ च्या हंगामात संघाचे नेतृत्व भारतीय फलंदाज केएल राहुल याच्याकडे होते आणि दिग्गज फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळत होते. यादरम्यान ख्रिस गेल अनिल कुंबळेबरोबर बोलताना रडत असल्याचही त्याने सांगितलं आहे.
ख्रिस गेलचा पंजाब किंग्स संघाबाबत मोठा खुलासा
ख्रिस गेल म्हणाला, “माझी आयपीएल कारकीर्द तर वेळेआधीच संपली. पंजाब किंग्समध्ये मला थोडाही आदर मिळाला नाही. मी या स्पर्धेसाठी आणि फ्रँचायझीसाठी खूप काही केलं, पण माझ्याशी असं वागलं गेलं की मी जणू लहान मुलगा आहे. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मला डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं वाटलं. त्यामुळे जेव्हा कोणी डिप्रेशनबद्दल बोलतं, तेव्हा मला त्याबाबत थोडा फार अंदाज येतो.”
गेल पुढे सांगत होता की, त्यावेळी पैशापैकी जास्त त्याचं मानसिक आरोग्य जास्त महत्त्वाचं होतं. कोविड-१९ मुळे खेळाडू आधीच घाबरलेल्या स्थितीत होते, ज्यामुळे मानसिक दबाव आणखी वाढला.
ख्रिस गेलला कॉल करून कर्णधार केएल राहुल काय म्हणाला होता?
गेलने तत्कालीन प्रशिक्षक अनिल कुंबळेंशी याबाबत काय चर्चा केली हेही सांगितलं. गेल म्हणाला, “मी अनिलला सांगितलं की मी आता खेळू शकत नाही. त्यावेळी मला खूप मानसिक त्रास होत होता आणि विश्वचषकही जवळ आला होता. त्यात करोनामुळे कुठे बाहेरही जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे मानसिक तणाव अधिक वाढत होता. मी मुंबई इंडियन्सविरूद्ध अखेरचा सामना खेळलो आणि मला असं झालं, बस्स झालं. याला काही अर्थ नाहीये. मी या अशा गोष्टींमुळे स्वत:लाच त्रास करून घेतोय.”
“मग नंतर मी अनिल कुंबळेला कॉल केला आणि बोलता बोलता मला अक्षरश: रडायला आलं. कारण मी आतून खूप दुखावलो गेलो होतो. मी अनिल आणि संपूर्ण संघावर नाराज होतो. मी त्याला म्हटलं ऐक तुझे खूप आभार, पण मी आता खेळू शकणार नाही. केएल राहुल तेव्हा संघाचा कर्णधार होता. राहुलने मला कॉल केला आणि तो म्हणाला, ‘ख्रिस तुलाही माहितीये तुला थांबायचंय आणि तू पुढचा सामना खेळणार आहेस.’ मी त्याला म्हटलं माझं ऐक तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. मी माझं सामान भरलं आणि निघून गेलो.”
गेलला या संवादादरम्यान अँकरने जेव्हा आयपीएलमधील पुनरागमनाबद्दल विचारलं तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितलं, “माझ्यावर अन्याय झाला होता. मी खेळण्यासाठी उपलब्ध आहे. त्यांना हवं असेल तर मी नक्की परत येईन. हो, माझ्या मनात अजूनही घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी आहे. मी नेहमीच म्हणतो, निष्ठा ही खूप मोठी गोष्ट आहे.”
ख्रिस गेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १४२ सामन्यांमध्ये ३९.७२ च्या सरासरीने आणि १४८.९२ च्या स्ट्राईक रेटने ४९६५ धावा केल्या. यामध्ये ६ शतकं आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे.