एपी, रबात (मोरोक्को)
विनिशियस ज्युनियर आणि फेडेरिको व्हॅल्व्हर्डे यांनी झळावलेल्या दोन गोलच्या जोरावर रेयाल माद्रिदने क्लब विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सौदी अरेबियाच्या अल हिलाल क्लबवर ५-३ असा विजय मिळवला आणि विक्रमी आठव्यांदा स्पर्धेचे जेतेपद मिळवले.निर्णायक सामन्यात अपेक्षेनुसार माद्रिदने आक्रमक सुरुवात केली. विनिशियसने सामन्याच्या १३व्या मिनिटाला संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर काही मिनिटांतच फेडेरिकोने (१८व्या मि.) गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. अल हिलालकडून मोसा मारेगाने (२६व्या मि.) गोल झळकावत आघाडी २-१ अशी कमी केली. माद्रिदने मध्यांतरापर्यंत आपली आघाडी कायम राखली.
दुसऱ्या सत्रात माद्रिदने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. तारांकित खेळाडू करिम बेन्झिमाने (५४ व्या मि.) प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीला चकवत माद्रिदच्या खात्यात आणखी एका गोलची भर घातली. यानंतर फेडेरिकोने (५८व्या मि.) गोल करत संघाला ४-१ असे सुस्थितीत पोहोचवले. अल हिलालकडून लूसियानो वीटोने (६३व्या मि.) गोल करत संघाच्या खात्यात दुसऱ्या गोलचा भरणा केला. यानंतर विनिशियसने (६९व्या मि.) संघाच्या खात्यात पाचव्या गोलची भर घातली. ७९व्या मिनिटाला वीटोने अल हिलालसाठी तिसरा गोल केला. यानंतर माद्रिदच्या बचावफळीने प्रतिस्पर्धी संघाला कोणतीच संधी दिली नाही.त्यापूर्वी, तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात ब्राझीलचा क्लब फ्लेमिंगोने इजिप्तचा क्लब अल आहलीवर ४-२ असा विजय मिळवला.