नवी दिल्ली : सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीतील कामगिरीची मला अजिबातच चिंता नाही. संघहिताला प्राधान्य देत आक्रमक शैलीत खेळताना कधीतरी अपयश येणारच, असे म्हणत भारताचा मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीरने ट्वेन्टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमारला पाठिंबा दर्शविला.
सूर्यकुमारने कर्णधार म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने अलीकडेच आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मात्र, या स्पर्धेत फलंदाज म्हणून तो अपयशी ठरला. त्याला सात डावांत केवळ ७२ धावाच करता आल्या. सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्षभरापासून अर्धशतक केलेले नाही. परंतु प्रशिक्षक गंभीर याबाबत निश्चिंत आहे.
‘‘सूर्यकुमारला ३० चेंडू खेळून ४० धावा करणे सहज शक्य आहे. तसे केल्यास त्याच्यावर टीकाही होणार नाही. मात्र, संघ म्हणून आम्ही ठरविलेल्या अतिआक्रमक शैलीत खेळताना कधीतरी अपयश येणार हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही ही बाब स्वीकारली आहे. आमचा सूर्यकुमारसह सर्व खेळाडूंना पूर्ण पाठिंबा आहे. संघहित सर्वांत महत्त्वाचे,’’ असे गंभीरने ‘जिओहॉटस्टार’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
आशिया चषकात एकीकडे सूर्यकुमारला अपयश येत असताना, दुसरीकडे अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांसारख्या युवकांनी चमकदार कामगिरी केली. ‘‘अभिषेक चांगल्या लयीत आहे. संपूर्ण आशिया चषकात त्याने सातत्य राखले हे विशेष. सूर्यकुमारला स्वत:ची जबाबदारी ठाऊक आहे. त्याला सूर गवसल्यावर तोसुद्धा महत्त्वपूर्ण योगदान देईल याची आम्हाला खात्री आहे.
ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये वैयक्तिक धावांपेक्षा खेळण्याची शैली जास्त महत्त्वाची असते. आम्ही आक्रमक शैलीतच खेळायचे ठरवले आहे. आमचे फलंदाज काही वेळा अपयशी ठरतील, पण जितके वेळा ते यशस्वी ठरतील, तितके वेळा संघ म्हणून आम्हाला रोखणे प्रतिस्पर्ध्याला अवघड जाईल. आमच्या दृष्टीने केवळ धावा महत्त्वाच्या नाहीत,’’ असे गंभीरने स्पष्ट केले.
सूर्यकुमार उत्तम खेळाडू आहेच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे तो चांगला माणूस आहे. असा माणूस यशस्वी कर्णधार होतोच. त्याला वेळोवेळी योग्य सल्ला देणे हे माझे काम आहे. हा त्याचा संघ आहे आणि त्याला योग्य वाटतील असे निर्णय घेण्याची त्याला पूर्ण मुभा आहे. – गौतम गंभीर, भारताचा प्रशिक्षक.
