महिला टी२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या महिलांनी भारतीय महिलांवर मात करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारतीय संघाच्या या पराभवापेक्षा उपांत्य सामन्यात मिताली राजला संघातून वगळण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. या निर्णयावर मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याकडून एकमेकांवर वेगवेगळे आरोप लावले जात आहेत. त्यातच यासंबंधी रमेश पोवार यांनी दोन फोटो ट्विट केले आहेत.

मिताली राज हिने BCCI च्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून आपली खंत व्यक्त केली होती. प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मला अपमानास्पद वागणूक दिल्याचे तिने म्हटले होते. पण मितालीनेच सलामीला फलंदाजीचा हट्ट धरत तसे न झाल्यास निवृत्ती स्वीकारेन अशी धमकी दिल्याचे रमेश पोवार यांनी सांगितले. त्यावर ‘मी माझ्या २० वर्षाच्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी खेळले. घाम गाळला. पण माझ्यावर असे आरोप केल्यांनतर मात्र माझी ही कारकीर्द वाया गेली’ अशा भावना तिने ट्विटद्वारे व्यक्त केल्या होत्या.

यावर उत्तर म्हणून रमेश पोवार यांनी दोन फोटो ट्विट केले आहेत. त्यातील पहिले ट्विट हे मायकल जॉर्डन या क्रीडापटूचे आहे. ‘जीवनात अडथळे येतच राहतात, पण त्यावर मात करून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे’, अशा आशयाचा संदेश देणारे जॉर्डन याचे वाक्य असलेला फोटो त्यांनी ट्विट केला आहे.

तर दुसरा फोटो हा क्षमाशीलतेचा गुणधर्म सांगणारा आहे. पण त्यातदेखील रमेश पोवार यांनी मितालीला नाव न घेता ट्विटद्वारे शालजोडीतील चपराक लगावली आहे. ‘आरोप करणारे क्षमा करण्याच्या तोडीचे आहेत म्हणून नव्हे तर आपल्याला शांतता लाभावी म्हणून आपल्यावर आरोप करणाऱ्यांना आपण क्षमा करावी’ असा संदेश देणारा फोटो त्यांनी ट्विट केला आहे.

दरम्यान, हे प्रकरण आता चांगलेच तापले असून याबाबत मिताली पुन्हा काय उत्तर देते याकडे नेटकऱ्यांचे लक्ष आहे.