बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसरा दिवस (३१ जुलै) भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी गाजवला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कास्य पदकाची कमाई झाली. या चार पदकांपैकी दोन पदकं मुलींनी जिंकली आहेत. मीराबाई चानूने सुवर्ण तर बिंद्याराणी देवीने रौप्य पदकाला गवसणी घातली. मीराबाईने यावर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तिच्या यशानंतर तिच्या कुटुंबियांनी जोरदार जल्लोष केला.
ऑलिंपिक रौप्य पदक विजेता मीरबाई चानू एकून २०१ किलो ग्रॅम वजनाचा भार पेलवून भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. २०१ किलो ग्रॅम वजन उचलून तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एक नवीन विक्रम नोंदवला. २७ वर्षीय चानूने स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजनातही नवे विक्रम प्रस्थापित केले. तिची कामगिरी बघून तिची आई आणि नातेवाईकांनी भारतात आनंदोत्सव साजरा केला. मीराबाईने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या आनंदोत्सवाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
मीराबाई चानूचे गाव मणिपूरमधील इंफाळ शहरापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. तिथे तीची आई तिथे एक दुकान चालवते. मीराबाईने देशासाठी सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी नातेवाईक आणि शेजाऱ्यांसह आनंद साजरा केला. यावेळी महिलांनी हातामध्ये राष्ट्रध्वज घेऊन पारंपरिक नृत्य केले.
हेही वाचा – CWG 2022: सुवर्णपदक विजेत्या जेरेमीच्या हातावर रहस्यमयी टॅटू; जाणून घ्या त्यामागील गोष्ट
वेटलिफ्टिंगमध्ये भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आहे. मीराबाई पाठोपाठ जेरेमी लालरिन्नुगादेखील सुवर्णपदक पटकावले आहे. त्यापूर्वी, महाराष्ट्रच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावत भारतासाठी पदकांचे खाते उघडले. संकेत सरगरनंतर पुरुष वेटलिफ्टिंगच्या ६१ किलो वजनी गटात गुरुराजा पुजारी यानेदेखील कांस्यपदक मिळविले. याशिवाय बिंद्याराणी देवीने रौप्यपदकाची कमाई केली.