‘मला तिसऱया स्थानावर खेळू द्या आणि कोहलीला सहाव्या, मग तुलना करा’

अपेक्षित कामगिरी होत नसल्यामुळे तो टीकेचा केंद्रबिंदू

कोहलीसारखा तू यशस्वी खेळी का साकारत नाहीस? असा प्रश्न अकमलला विचारण्यात आला होता.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या दमदार फॉर्मात आहे. फलंदाजीसोबतच कोहलीने आपले नेतृत्त्व गुण देखील सिद्ध करून दाखवले आहेत. पण पाकिस्तानच्या खेळाडूंना मात्र कोहलीच्या कामगिरीचे वावडेच असल्याचे दिसते. पाकिस्तानच्या फलंदाज उमर अकमल याने आपली तुलना कोहलीसोबत करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. उमर अकमलकडून गेल्या काही सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी होत नसल्यामुळे तो टीकेचा केंद्रबिंदू झाला आहे. यावर स्पष्टीकरण देताना अकमलने आपल्या फलंदाजी क्रमवारीवर खापर फोडले. खालच्या स्थानावर फलंदाजी केल्यामुळे खेळपट्टीवर खूप कमी वेळ मिळतो, असे अकमलने सांगितले.

 

नुकतेच अकलमला एका स्थानिक सामन्यात ४२ चेंडूत ६६ धावांची खेळी साकारली होती. पण ऐनवेळी अकमलने विकेट टाकली आणि संघाला विजयापासून वंचित रहावे लागले होते. अकमलला रोषाला सामोरे जावे लागले. यावरून अकमलला कोहलीच्या सातत्यपूर्ण खेळीचा संदर्भ देऊन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अकमलचा संताप झाला. कोहलीसारखा तू यशस्वी खेळी का साकारत नाहीस? असा प्रश्न अकमलला विचारण्यात आला होता. कोहलीसोबत माझी तुलना करणे योग्य नाही. तो संघात तिसऱया स्थानावर फलंदाजीला येतो, तर मी खालच्या क्रमाकांवर फलंदाजी करतो याचा विचार करा. मला संघात तिसऱया स्थानावर खेळायला द्या आणि विराटला सहाव्या, त्यानंतर आमची तुलना करा, असे वक्तव्य उमर अकमल याने केले. विराटची तुलना तुम्ही आमच्या संघातील बाबर आझम याच्याशी करू शकता, कारण तो संघात तिसऱया स्थानावर फलंदाजीला येतो. बाबर आझम सध्या दमदार फॉर्मात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Compare virat kohli with me when he bats at no 6 says umar akmal