इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये प्रतिष्ठेची झुंज

चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांनी इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या १२व्या पर्वात शानदार कामगिरी करत प्रत्येकी ८ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दोघांचेही समान १६ गुण झाले असले तरी बुधवारी होणाऱ्या या अव्वल संघांमधील सामन्यात अग्रस्थान पटकावण्याकडे दोन्ही संघांचे लक्ष लागले आहे.

दिल्ली कॅपिटल्सने पहिल्यांदाच अग्रस्थानी झेप घेतली असली तरी सातत्याने अव्वल स्थान पटकावणाऱ्या चेन्नईला आपले बाद फेरीतील स्थान अधिक भक्कम करण्यासाठी पहिले स्थान खुणावत आहे. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आता फक्त दोन सामने शिल्लक राहिल्यामुळे पहिल्या दोन जणांमध्ये स्थान पटकावण्यासाठी चेन्नई संघ उत्सुक आहे.

धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नईची फलंदाजी कोलमडल्यामुळे मुंबई इंडियन्सला ४६ धावांनी सहज विजय मिळवता आला. त्यामुळेच दिल्ली कॅपिटल्सने एकूण सरासरीच्या आधारावर चेन्नईला मागे टाकत अग्रस्थानी झेप घेतली. तापाने आजारी पडल्यामुळे गेल्या सामन्यात धोनीला खेळता आले नव्हते. आता घरच्या मैदानावर होणाऱ्या या अखेरच्या सामन्यात धोनी पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी अपेक्षा चेन्नईला आहे. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाही पुनरामन करेल, अशी आशा चेन्नईला आहे.

गेल्या पाचपैकी चार सामन्यांत विजय मिळवल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला आहे. संघाचे नेतृत्व सांभाळताना युवा कर्णधार श्रेयस अय्यरने अप्रतिम कामगिरी बजावली आहे. कर्णधार म्हणून श्रेयस यशस्वी ठरला असताना त्याच्याकडून चेन्नईविरुद्धही दमदार कामगिरीची अपेक्षा दिल्लीला असेल. त्याचबरोबर चेपॉकच्या धिम्या गतीच्या खेळपट्टीवर सलामीवीर शिखर धवन, पृथ्वी शॉ यांना पूर्वीसारखाच सूर गवसेल, अशी आशा बाळगली जात आहे. चेपॉकची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक मानली जात असून यंदाच्या हंगामातील सर्वाधिक बळी मिळवणारा कॅगिसो रबाडा कशी कामगिरी करतो, यावर दिल्लीचे भवितव्य अवलंबून असेल.

चेन्नईच्या घरच्या मैदानावर त्यांच्या इम्रान ताहीर आणि हरभजन सिंग यांनी भल्याभल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवले आहे. त्यामुळे धवन आणि पृथ्वी या फिरकीपटूंवर ते कशी मात करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दिल्लीचे फलंदाज वि. चेन्नईची प्रभावी फिरकी असा हा सामना रंगण्याची शक्यता आहे.

 

संघ

चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फॅफ डय़ू प्लेसिस, मुरली विजय, केदार जाधव, सॅम बिलिंग्स, रवींद्र जडेजा, ध्रुव शोरे, चैतन्य बिश्णोई, रितूराज गायकवाड, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, इम्रान ताहिर, हरभजन सिंग, मिचेल सान्तनेर, शार्दूल ठाकूर, मोहित शर्मा, के. एम. आसिफ, दीपक चहर, एन. जगदीशन, स्कॉट कुगेलेईन.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), कॉलिन इन्ग्राम, मनज्योत कालरा, पृथ्वी शॉ, शेरफाने रुदरफोर्ड, शिखर धवन, अमित मिश्रा, आवेश खान, बंडारू अयप्पा, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, नाथू सिंग, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, जलाज सक्सेना, किमो पॉल, राहुल तेवतिया, अंकुश बेन्स.

१९

आतापर्यंत चेन्नई आणि दिल्ली यांच्यात १९ सामने झाले असून त्यात चेन्नईने १३ तर दिल्लीने ६ सामने जिंकले आहेत.

चेन्नईने आतापर्यंत तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले असून दिल्लीला एकदाही करंडकावर मोहोर उमटवता आलेली नाही.

यंदाच्या मोसमातील उभय संघांमधील हा दुसरा सामना असून पहिल्या सामन्यात चेन्नईने ६ गडी राखून विजय मिळवला होता.

 सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि सिलेक्ट १