अनेक अडथळे आणि समस्यांवर मात करत १२५ वर्षे जुने असलेले आणि देशाला बरेचसे आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू देणारे मुंबईतील कूपरेज स्टेडियम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ या म्हणीप्रमाणेच कूपरेजच्या नूतनीकरणात अनेक अडचणी आल्या. त्यामुळे गेली चार वर्षे कूपरेजवर ‘आय-लीग’ फुटबॉल स्पर्धेचा एकही सामना होऊ शकला नाही. पण पुढील वर्षांच्या सुरुवातीलाच दिमाखदारपणे कूपरेज स्टेडियम नव्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे.
नवे कोरे अ‍ॅस्ट्रोटर्फ, पाच हजार प्रेक्षकांची आसनव्यवस्था, खेळाडूंसाठी सोयीसुविधा असलेली ड्रेसिंगरूम, प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये  ेम्हणून बांधण्यात आलेले स्वच्छतागृह तसेच विद्युतझोतात सामने खेळवण्याची क्षमता असलेल्या कूपरेज स्टेडियमचे उद्घाटन १५ जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे.
गेली दोन वर्षे नूतनीकरणाच्या कामामुळे मुंबईतील संघांना घरच्या मैदानावर एकही सामना खेळता आला नाही. या वर्षीचा आय-लीगचा मोसम जवळपास संपत आला असला तरी अखेरचे दोन सामने कूपरेज स्टेडियमवर होतील. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आयएमजी-रिलायन्स स्पर्धेतील मुंबई फ्रँचायझी संघाचे पाच सामने नवी मुंबईत तर उर्वरित दोन सामने कूपरेजवर होणार आहेत. या सामन्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वास वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे (विफा) मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्री मेनेझेस यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर एमडीएफए चषक आणि रोव्हर्स चषक स्पर्धाही कूपरेज स्टेडियमवर खेळवण्यासाठी विफा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
कूपरेज स्टेडियमविषयीच्या भविष्यातील योजनांची माहिती देताना ते म्हणाले, ‘‘मुंबईत फुटबॉलचा चाहतावर्ग मोठय़ा प्रमाणावर आहे. याच फुटबॉलचाहत्यांना आकर्षित करण्यासाठी आम्ही कूपरेजवर विद्युतझोतात सामने खेळवणार आहोत. बलाढय़ संघ आणि अव्वल खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी पूर्वीप्रमाणेच कूपरेजवर मोठय़ा प्रमाणावर गर्दी उसळेल, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक सामन्यासाठी आम्ही २०० रुपये तिकीटदर ठेवणार असून त्या मोबदल्यात प्रेक्षकांना खाण्या-पिण्यासह सामन्याचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी आम्ही देणार आहोत.’’
‘‘सध्या मुंबईतील फुटबॉल संघांना सराव करण्यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेले स्टेडियम उपलब्ध नाही. त्यांना बाहेरच्या मैदानांवर सराव करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. म्हणूनच आम्ही त्यांना वाजवी दरात स्टेडियम उपलब्ध करून देणार आहोत. त्याचबरोबर प्रशिक्षकांसाठी प्रमाणपत्र अभ्यासक्रम, लहान मुलांसाठी सराव शिबीरे याच मैदानावर आयोजित केली जातील,’’ असे मेनेझेस यांनी सांगितले.