दारूच्या नशेत गाडी चालवून अपघात केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरटय़ुरो व्हिडालचे प्रकरण बाजूला ठेवत चिलीने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बोलिव्हियावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला. या दिमाखदार विजयासह चिलीने अंतिम आठमध्ये आगेकूच केली.
शेवटच्या लढतीत व्हिडालने दोन गोलसह चिलीच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. मात्र त्यानंतर काही तासांतच व्हिडालची फेरारी गाडी आणखी एका गाडीवर जाऊन आदळली. दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या व्हिडालला पोलिसांनी अटक केली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. व्हिडालला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान चिली संघव्यवस्थापन व्हिडालला गैरवर्तनाप्रकरणी शिक्षा सुनावणार का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र व्हिडालच्या अनुपस्थितीतही चिलीने विजयी परंपरा कायम राखली.
चिलीतर्फे चार्ल्स अरनग्युझने दोन तर अलेक्सिस सँचेझ आणि गॅरी मेडल यांनी प्रत्येकी एक गोल केला. बोलिव्हियातर्फे रोनाल्ड राल्ड्सने स्वयंगोल केल्याने चिलीच्या गोलखात्यात भर पडली. या विजयासह ‘अ’ गटात चिलीने अव्वल स्थान पटकावले. उपांत्यपूर्व फेरीत चिलीचा मुकाबला पॅराग्वे किंवा उरुग्वेशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पराभवानंतरही बोलिव्हियाचे बाद फेरीतील स्थान कायम आहे. तब्बल १८ वर्षांनंतर बोलिव्हियाला या स्पर्धेच्या बाद फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 21st Jun 2015 रोजी प्रकाशित
चिलीची घोडदौड
दारूच्या नशेत गाडी चालवून अपघात केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरटय़ुरो व्हिडालचे प्रकरण बाजूला ठेवत चिलीने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत बोलिव्हियावर ५-० असा दणदणीत विजय मिळवला.

First published on: 21-06-2015 at 12:09 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Copa america