मँचेस्टर : भारताचा तारांकित यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतमधील धाडस पुन्हा एकदा दिसून आले. पायाला फ्रॅक्चर असल्याने डॉक्टरांनी सहा आठवडे विश्रांतीचा सल्ला देऊनही भारतीय संघाला ‘गरज’ असल्याने लढवय्या पंत इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी मैदानावर उतरला. त्याने अर्धशतकी खेळी केल्याने भारताला पहिल्या डावात ३५८ धावांपर्यंत मजल मारता आली.
कसोटीच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करताना पंतला दुखापत झाली. वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने टाकलेल्या चेंडूवर पंतने ‘रीव्हर्स स्वीप’चा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्याला यश आले नाही. बॅटची कड घेऊन चेंडू पंतच्या उजव्या पावलावर आदळला. त्या वेळी त्याला बऱ्याच वेदना झाल्या. त्यानंतर फिजिओ आणि भारताच्या राखीव फळीतील खेळाडूंच्या साहाय्याने पंतने बूट काढला. त्याच्या पायाला सूज आल्याचे आणि त्यातून रक्तही येत असल्याचे दिसून आले. त्यानंतर विशेष ‘बग्गी’च्या साहाय्याने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. त्याच्या चाचण्या करण्यात आल्या. यात त्याच्या पावलाला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. डाॅक्टरांनी त्याला सहा आठवडे विश्रांतीचा सल्लाही दिला. मात्र, त्यानंतरही दुसऱ्या दिवशी तो फलंदाजीसाठी आला.
पहिल्या दिवसअखेर नाबाद असणाऱ्या रवींद्र जडेजा (२०) आणि शार्दूल ठाकूर (४१) यांना भारताने दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात गमावले. शार्दूल बाद होण्यापूर्वी ‘बीसीसीआय’ने ‘एक्स’वरून पंतबाबत माहिती दिली होती. ‘‘पंतच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या कसोटीत यष्टिरक्षण करणार नाही. त्याच्या जागी ध्रुव जुरेल ही जबाबदारी सांभाळेल. मात्र दुखापतीनंतरही पंत भारतीय संघाबरोबर मैदानात आला असून गरज भासल्यास तो फलंदाजी करेल,’’ असे ‘बीसीसीआय’ने नमूद केले होते. त्यानंतर साधारण तासाभरातच शार्दूलच्या रूपात भारताने सहावा गडी गमावला आणि पंतला फलंदाजीसाठी पाठविण्यात आले. तो मैदानात दाखल होत असताना स्टेडियममध्ये उपस्थित दोन्ही संघांच्या चाहत्यांनी उभे राहून त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या.
साधारण तीन वर्षांपूर्वी दिल्ली-डेहराडून महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पंत गंभीररीत्या जखमी झाला होता. केवळ त्याची क्रिकेट कारकीर्दच नाही, तर त्याच्या जिवालाही धोका निर्माण झाला होता. मात्र वर्षभराची कठोर मेहनत, जिद्द आणि दृढनिश्चयाच्या जोरावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले होते. आता मँचेस्टर कसोटीतील कृतीने त्याच्यातील ‘धाडस’ पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
इशानही जायबंदी, जगदीशनला संधी?
– पंतने सध्या सुरू असलेल्या कसोटीत फलंदाजी केली असली, तरी तो पुढील सामन्याला मुकणार हे निश्चित आहे. त्याच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलला अंतिम ११ खेळाडूंत स्थान मिळेल.
– राखीव यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून इशान किशनला संधी मिळणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. मात्र, किशनही पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याची माहिती निवड समितीला देण्यात आली. तो सध्या घोट्याच्या दुखपतीतून सावरत आहे.
– पंतपाठोपाठ किशनही जायबंदी असल्याने अखेर निवड समितीने तमिळनाडूचा २९ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज एन. जगदीशनला इंग्लंडला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
– जगदीशनने आतापर्यंत ५२ प्रथमश्रेणी सामने खेळले असून ४७.५०च्या सरासरीने ३३७३ धावा केल्या आहेत. यात १० शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे.