यशस्वी जैस्वालच्या शतकामुळे गोव्यावर १३० धावांनी मात

सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालच्या शानदार शतकामुळे मुंबईने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्यावर १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ४ बाद ३६२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. यशस्वीने सहा चौकार आणि पाच षटकारांसह १२३ चेंडूंत ११३ धावांची खेळी साकारून या धावसंख्येत सिंहाचा वाटा उचलला. यशस्वीने आदित्य तरे (९३ चेंडूंत ११ चौकार आणि २ षटकारांसह ८६ धावा) २९ षटकांत १५२ धावांची दिमाखदार सलामी नोंदवली. तरे बाद झाल्यावर यशस्वीने सिद्धेश लाडच्या (३४) साथीने दुसऱ्या गडय़ासाठी ७२ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर श्रेयस अय्यर (२९ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४७ धावा), सूर्यकुमार यादव (२१ चेंडूंत २ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ३४ धावा) आणि शिवम दुबे (१३ चेंडूंत १ चौकार आणि ४ षटकारांसह ३३ धावा) यांनी वेगवान धावा काढल्यामुळे मुंबईला साडेतीनशे धावांचा टप्पा ओलांडता आला.

त्यानंतर गोव्याचा डाव ४८.१ षटकांत आटोपला. गोव्याकडून फक्त स्नेहल कौठणकरला अर्धशतक साकारता आले. याशिवाय आदित्य कौशिकने ४३ आणि सगुण कामतने ३२ धावा केल्या. मुंबईकडून शाम्स मुलानीने ३८ धावांत ३ बळी घेतले, तर शार्दूल ठाकूरने ३३ धावांत २ बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : ५० षटकांत ४ बाद ३६२ (यशस्वी जैस्वाल ११३, आदित्य तरे ८६, श्रेयस अय्यर ४७; अमित वर्मा २/६५) विजयी वि. गोवा : ४८.१ षटकांत सर्व बाद २३२ (स्नेहल कौठणकर ५०, आदित्य कौशिक ४३; शाम्स मुलानी ३/३८)

गुण : मुंबई ४, गोवा ०