स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन २०२२च्या रूपाने २१वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकून इतिहास रचला. मेलबर्नच्या रॉड लेव्हर एरिना येथे झालेल्या अंतिम फेरीत दोन सेटमध्ये पिछाडीवर पडूनही नदालने शानदार पुनरागमन केले आणि ५ तास २४ मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा २-६, ६-७, ६-४, ६-४, ७-५ असा पराभव केला.

नदालच्या या शानदार पुनरागमनाला क्रिकेट जगतानेही त्याला सलाम केला आहे. महान फलंदाज सचिन तेंडुलकरपासून, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि रवीचंद्रन अश्विन या दिग्गज क्रिकेटपटूंनी नदालच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. विक्रमी २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकणारा नदाल हा जगातील पहिला पुरुष टेनिसपटू ठरला आहे.

नक्की पाहा – PHOTOS : पहिल्या दोन सेटमध्ये पीछेहाट, मग धमाकेदार कमबॅक अन् शेवटी ग्रँडस्लॅम नंबर २१!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नदालने दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये फ्रेंच स्पर्धेत २०वे ग्रँडस्लॅम जिंकले. यानंतर दुखापती, करोनामुळे सराव आणि सहभागावर येत असलेल्या मर्यादा आणि वाढते वय अशा विविध कारणांमुळे नदालची वाटचालही फेडररप्रमाणेच २० अजिंक्यपदांपाशी थबकली असे वाटत होते. परंतु, अविश्वसनीय तंदुरुस्ती आणि असामान्य जिद्द दाखवत त्याने त्याच्या दृष्टीने सर्वाधिक खडतर ठरत आलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद दुसऱ्यांदा पटकावून दाखवले. याआधी २००९मध्ये नदालने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती.