पीटीआय, केप टाऊन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेली सात वर्षे भारतीय कसोटी संघाला मेहनत, अथक परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर प्रगतीच्या दिशेने नेल्यानंतर आता थांबण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत शनिवारी विराट कोहलीने भारताच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला. २०१४मध्ये कसोटी संघाचे नेतृत्वपद स्वीकारणाऱ्या कोहलीने ‘ट्विटर’च्या माध्यमातून जगभरातील चाहत्यांना हा आश्चर्याचा धक्का दिला. शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-२ अशा फरकाने गमावल्यानंतर कोहलीच्या नेतृत्वासह भारतीय खेळाडूंवर काही माजी क्रिकेटपटूंसह चाहत्यांनीही ताशेरे ओढले. अखेर शनिवारी सायंकाळी कोहलीने निवृत्तीचा निर्णय जाहीर करतानाच त्याचे मनोगतही व्यक्त केले.

‘‘गेल्या सात वर्षांपासून भारतीय संघाचे नेतृत्व करताना मी प्रामाणिकपणे कोणत्याही बाबीची कमी पडू दिली नाही. मात्र प्रत्येक गोष्ट कधी तरी थांबली पाहिजे. भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून माझ्यासाठीसुद्धा थांबण्याची हीच योग्य वेळ आहे,’’ असे कोहलीने निवेदनात नमूद केले. ‘‘या प्रवासात असंख्य चढ-उतारांना सामोरे जावे लागले. परंतु यामुळे माझे प्रयत्न कधीही कमी झाले नाहीत. कोणतेही कार्य करताना १२० टक्के योगदान देण्याला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे. मात्र तसे न जमल्यास मी स्वत:सह संघाचीही फसवणूक केल्यासारखे होईल. त्यामुळे मनात पूर्ण स्पष्टता बाळगूनच मी हा निर्णय घेत आहे,’’ असेही कोहलीने म्हटले.

याव्यतिरिक्त कोहलीने बीसीसीआय, माजी प्रशिक्षक रवी शास्त्री, संघ सहकारी आणि माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीचे विशेष आभारही मानले. ‘‘माझ्यातील नेतृत्वगुणाला हेरल्याबद्दल तसेच भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मला पात्र समजल्याबद्दल धोनीचा मी सदैव ऋणी राहीन,’’ अशा शब्दांत कोहलीने निवेदनाचा शेवट केला.

यशस्वी कसोटी कर्णधार

क्र. कर्णधार विजय

१.  ग्रॅमी स्मिथ  ५३

२.  रिकी पाँटिंग ४८

३.  स्टीव्ह वॉ   ४१

४. विराट कोहली ४०

यशस्वी भारतीय कर्णधार

क्र. कर्णधार विजय

१.  विराट कोहली ४०

२.  महेंद्रसिंह धोनी   २७

३.  सौरव गांगुली २१

४. मो. अझरुद्दीन  १४

सर्वाधिक सामन्यांत भारताचे नेतृत्व

क्र. कर्णधार विजय

१.  विराट कोहली ६८

२.  महेंद्रसिंह धोनी   ६०

३.  सौरव गांगुली ४९

कसोटी कर्णधारपदसुद्धा रोहितकडे

कोहलीने राजीनामा दिल्यामुळे आता उपकर्णधार रोहित शर्माकडे कसोटी संघाचेही कर्णधारपद सोपवण्यात येणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. डिसेंबर महिन्यात रोहितची एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. रोहित दुखापतीमुळे या मालिकेला मुकल्याने, त्याच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलकडे आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी उपकर्णधारपद सोपवण्यात आले होते. त्यामुळे श्रीलंकेविरुद्ध फेब्रुवारीत मायदेशात होणाऱ्या मालिकेत रोहित कर्णधार, तर राहुल उपकर्णधाराची भूमिका बजावले. मात्र काही माजी क्रिकेटपटू तसेच चाहत्यांनी ऋषभ पंत किंवा जसप्रीत बुमराला कसोटी संघाचा कर्णधार बनवण्याची मागणी केली आहे.

जेव्हा कोहलीने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद स्वीकारले, त्या वेळी परदेशात मालिका जिंकणे म्हणजे फार मोठा पराक्रम मानला जायचा. आता परदेशात मालिका गमावल्यावर ते अनपेक्षित मानले जाते. यावरूनच कोहलीची कर्णधार म्हणून महानता सिद्ध होते. कोहली तुझे यशस्वी कारकीर्दीबद्दल अभिनंदन.

– वासिम जाफर, माजी क्रिकेटपटू

विराट, तुझे यश अभिमानास्पद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जे तू साध्य केले आहेस, ते क्वचित कर्णधारांनाच जमले आहे. तू भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहेस. मात्र आपण दोघांनी मिळून हा संघ उभारल्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी फार दु:खद आहे.

– रवी शास्त्री, माजी प्रशिक्षक

भारतीय कसोटी इतिहासातील सर्वाधिक यशस्वी कर्णधार कोहलीचे अभिनंदन. आकडे कधीच खोटे बोलत नाहीत. कोहली तुझ्या नेतृत्वाने जगभरात छाप पाडली आहे. त्यामुळे स्वत:चा अभिमान बाळग. फलंदाज म्हणून तुझ्या बॅटमधून धावांचा वर्षांव पाहण्यासाठी आतुर आहे.

– वीरेंद्र सेहवाग, माजी क्रिकेटपटू

कोहलीचा कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय ऐकून मला मुळीच धक्का बसलेला नाही. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर तो पत्रकार परिषदेदरम्यानच नेतृत्वपद सोडेल, असे मला वाटले. परंतु त्याने विचार करून २४ तास उशिराने हा निर्णय घेतला. कदाचित मालिका गमावल्यामुळे आपल्याला कसोटी संघाच्या कर्णधारपदावरूनही काढण्यात येईल, अशी भीती त्याच्या मनात होती. 

– सुनील गावस्कर, माजी क्रिकेटपटू

  घटनाक्रम

  • १६ सप्टेंबर, २०२१ : ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याची घोषणा
  • २० सप्टेंबर, २०२१ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघाचे नेतृत्वपद सोडले
  • ८ डिसेंबर, २०२१ : कोहलीची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी
  • ९ डिसेंबर, २०२१ : ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुलीकडून कोहलीला कल्पना दिल्याची ग्वाही
  • १५ डिसेंबर, २०२१ : ‘बीसीसीआय’ने पूर्वकल्पना न दिल्याचा कोहलीचा गौप्यस्फोट
  • १५ जानेवारी, २०२२ : कोहली कसोटी संघाच्या कर्णधारपदावरूनही पायउतार
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket kohli relinquish test leadership ysh
First published on: 16-01-2022 at 01:27 IST