‘‘भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याचे स्वप्न साकारणे, हे अवघड आव्हान असले तरी ते साकार करण्याच्या दिशेनेच मी वाटचाल करीत आहे आणि हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,’’ असा आत्मविश्वास महाराष्ट्राचा रणजीपटू केदार जाधव याने व्यक्त केला आहे.
केदार याने यंदाच्या रणजी मोसमाची सुरुवातच त्रिशतकाने केली आहे. भरवशाचा फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळेच की काय आगामी आयपीएल स्पर्धेकरिता दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने त्याला करारबद्ध केले आहे. उज्ज्वल भवितव्य लाभलेला खेळाडू म्हणून त्याने नावलौकिक मिळविला आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीविषयी आणि भविष्याविषयी त्याने ‘लोकसत्ता’शी दिलखुलास गप्पा मारल्या.
* दिल्ली डेअरडेव्हिल्सने नुकतेच तुला करारबद्ध केले आहे. त्याविषयी काय सांगता येईल?
दिल्लीकडून खेळण्याची मला दुसऱ्यांदा संधी मिळत आहे. यापूर्वी २०१०मध्ये दिल्लीकडूनच आयपीएल स्पर्धेत मी पदार्पण केले होते. त्या वेळी पर्दापणाच्या सामन्यात मी आक्रमक अर्धशतक करीत संघाला विजय मिळवून दिला होता आणि सामनावीर पुरस्कारही मी मिळवला होता. वीरेंद्र सेहवाग हा माझा आदर्श असल्यामुळे त्याच्या संघाकडून खेळायला मला नेहमीच आवडते. त्याच्याबरोबरच अनेक अनुभवी खेळाडू या संघात असल्यामुळे त्यांच्याशी सुसंवाद साधण्याची मला संधी मिळते आणि ही अनुभवाची शिदोरी मला भावी कारकीर्दीसाठी उपयुक्त ठरणार आहे. २०११मध्ये कोची टस्कर्सकडून मी खेळलो होतो. गतवर्षी हा संघच बंद पडल्यामुळे मला आयपीएलमध्ये खेळता आले नाही. आता पुन्हा दिल्लीने करारबद्ध केल्यामुळे मला विलक्षण आनंद झाला आहे.
* पुणे वॉरियर्स या घरच्या संघाकडून खेळायला आवडेल काय?
हो, निश्चितच. मात्र पुण्याच्या तुलनेत दिल्लीकडे अधिक अनुभवी खेळाडू असल्यामुळे मी त्या संघालाच प्राधान्य देईन. कोणत्याही संघाकडून खेळताना आपली कामगिरी शंभर टक्केकरण्याचे माझे ध्येय असते, पण दिल्लीकडून खेळताना खूपच शिकायला मिळते असा माझा यापूर्वीचा अनुभव आहे.
* रणजीत तू नुकतेच त्रिशतक झळकावले होते. गहुंजे येथील खेळपट्टी निर्जीव असल्यामुळेच हे शक्य झाले अशी टीका केली जात आहे. त्याविषयी तुझे काय मत आहे?
निर्जीव खेळपट्टीचा फायदा थोडासा झालाही असेल, परंतु हे त्रिशतक मी खूपच कमी चेंडूंमध्ये केले आहे. खेळपट्टी कशीही असली तरी या सामन्यात उत्तर प्रदेशकडून भुवनेश्वर कुमार, पीयूष चावला, सुरेश रैना यांच्यासारखे अनुभवी गोलंदाज होते व हे गोलंदाज कोणत्याही खेळपट्टीवर फलंदाजांवर प्रभुत्व गाजविणारे आहेत. त्यांना सामोरे जात तब्बल ५४५ मिनिटे खेळपट्टीवर टिच्चून राहताना मी हे त्रिशतक केले आहे. गेल्या ६३ वर्षांमध्ये रणजीत महाराष्ट्राकडून त्रिशतक करणारा मी तिसरा फलंदाज आहे. अर्थात आकडेवारीला मी फारसे महत्त्व देत नाही. संघाची बाजू भक्कम करण्यावरच माझा भर असतो.
* आजपर्यंतच्या तुझ्या या यशाचे श्रेय कोणाला देशील?
कारकीर्दीच्या सुरुवातीस मला सुनील काटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यानंतर गेली आठ वर्षे सुरेंद्र भावे यांच्या मार्गदर्शनाखाली माझा सराव सुरू आहे. फलंदाजीतील सर्व बारकावे त्यांनी मला शिकविले आहेत. माझ्या आईवडिलांचा माझ्या यशात मोठा वाटा आहे. त्यांनी सतत मला प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळेच कोणतीही बंधने न राहता मी क्रिकेट कारकीर्द करू शकलो आहे.
* तीन प्रकारच्या क्रिकेटपैकी कोणते तुला विशेष आवडते?
क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपात खेळण्यास मी तयार असतो. एकदिवसीय सामना असो किंवा ट्वेन्टी-२० सामना असेल, आपला नैसर्गिक खेळ करण्यावरच माझा भर असतो. आत्मविश्वासाने व सकारात्मक वृत्तीने खेळ करणे मी अधिक पसंत करीत असतो. तसेच कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची माझी तयारी असते.
*भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी खूपच स्पर्धा असते. त्यासाठी तू कशी तयारी केली आहेस?
भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी कामगिरीत सातत्य ठेवणे हाच माझा प्रयत्न आहे. यापूर्वी भारत ‘अ’ संघाकडून मी इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. त्यामुळे भारताच्या दुसऱ्या फळीत आपण राहिले पाहिजे, असा माझा प्रयत्न असून मुख्य संघात स्थान मिळविण्याचे माझे ध्येय लवकरच साकार होईल, अशी मला खात्री आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2012 रोजी प्रकाशित
आठवडय़ाची मुलाखत : भारताकडून खेळण्याचे स्वप्न साकारणार!
‘‘भारतीय क्रिकेट संघाकडून खेळण्याचे स्वप्न साकारणे, हे अवघड आव्हान असले तरी ते साकार करण्याच्या दिशेनेच मी वाटचाल करीत आहे आणि हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल,’’ असा आत्मविश्वास महाराष्ट्राचा रणजीपटू केदार जाधव याने व्यक्त केला आहे.

First published on: 26-11-2012 at 04:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket player kedar jadhav interview