जोहान्सबर्ग : आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात कगिसो रबाडाच्या रूपात केवळ एका आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय खेळाडूला स्थान मिळाले आहे. यामुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला त्यांच्याच देशातून बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागत आहे.ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी निवडलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघात नऊ गौरवर्णीय आणि सहा अन्य वंशाचे खेळाडू आहेत. या सहा जणांत रबाडा, रीझा हेंड्रिक्स, बोर्न फोर्टेन, केशव महाराज, तबरेझ शम्सी आणि ऑटनिल बार्टमन यांचा समावेश आहे. मात्र, यापैकी रबाडा हा एकमेव आफ्रिकन वंशाचा कृष्णवर्णीय खेळाडू आहे.

हेही वाचा >>> RR v PBKS: टॉम कोहलर कॅडमोर गळ्यात नेमकं काय घालून उतरला होता? त्या उपकरणाचा उपयोग काय, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या ‘परिवर्तनशील धोरणा’नुसार, संपूर्ण हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या अंतिम ११ खेळाडूंत केवळ पाच गौरवर्णीय असू शकतात. सहा खेळाडू अन्य वंशाचे, त्यातही दोन खेळाडू आफ्रिकन कृष्णवर्णीय असणे आवश्यक असते. मात्र, विश्वचषकासाठीच्या संघात केवळ रबाडा हा एकमेव आफ्रिकन कृष्णवर्णीय खेळाडू असल्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळ आपल्या ‘परिवर्तनशील धोरणा’पासून दूर राहणार आहे. दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रीडामंत्री फिकिले मबालुआ यांनी ही बाब अस्वीकार्ह असल्याचे म्हटले आहे. ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघात केवळ एक आफ्रिकन वंशाचा कृष्णवर्णीय खेळाडू आहे. या संघात संपूर्ण दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व दिसून येत नाही. काहींसाठी वेगळे नियम असल्याचे नक्कीच जाणवते,’’ असे मबालुआ यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले. तसेच दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) माजी अध्यक्ष रे माली यांनीही या निर्णयावर टीका केली.