विश्वचषकाच्या स्वरूपाबाबत कोहलीची सूचना

मँचेस्टर : एका खराब कामगिरीनंतर संभाव्य विजेत्या मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाच्या विश्वचषकाला गवसणी घालण्याच्या आशा संपुष्टात आल्या. त्यामुळेच विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या स्वरूपावर टीका होऊ लागली आहे. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटच्या (आयपीएल) धर्तीवर बाद फेरीचे स्वरूप असावे, अशी मागणी भारताचा कर्णधार विराट कोहलीने केली आहे.

साखळी फेरीत अग्रस्थान पटकावणाऱ्या भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून १८ धावांनी पराभव पत्करावा लागला. २४० धावांचे आव्हान पेलताना पहिल्या ४५ मिनिटांतच भारताने सामना गमावला, त्यामुळे कोटय़वधी चाहत्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. भविष्यात ‘आयपीएल’प्रमाणे ‘प्ले-ऑफ’ फेरीचा पर्याय असावा का, असे विचारले असता कोहली म्हणाला, ‘‘भविष्यात काय होईल, हे कुणालाही माहीत नाही. गुणतालिकेत अग्रस्थान पटकावणे हे सर्वकाही असते. त्यामुळे स्पर्धेचा आवाका पाहता, ‘प्ले-ऑफ’ फेरीचा विचार करायला काहीच हरकत नाही.’’

‘‘उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर मागील कामगिरी पुसली जाते. पण उपांत्य फेरी हीसुद्धा आव्हानात्मक असते. हीच तर या खेळाची किमया आहे. नव्याने मैदानात उतरून, नव्याने सुरुवात करून जर चांगली कामगिरी झाली नाही तर घरचा रस्ता पकडावा लागतो. त्यामुळे सध्या जे स्वरूप आहे, ते स्वीकारणे गरजेचे आहे,’’ असेही कोहलीने सांगितले.

रवींद्र जडेजाची खेळी डावखुऱ्या फलंदाजाने साकारलेली मी पाहिलेली सर्वोत्तम खेळी आहे, असे मला वाटते. कोहली म्हणाला, ‘‘जडेजाची न्यूझीलंडविरुद्धची खेळी ही सर्वोत्तम आहे, असे मला वाटते. कारण त्या क्षणी भारताचे आव्हान जवळपास संपुष्टात आले होते. उर्वरित फलंदाजांना प्रचंड दडपणाचा सामना करावा लागत होता. पण जडेजाने हार मानली नव्हती. त्याने जिद्दीने खेळ करत भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मोठी फटकेबाजी करण्यासाठी गरजेचा असलेला धोका त्याने  पत्करला.’’

धोनीचे अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक – एडल्जी

नवी दिल्ली : भारतीय महिला संघाच्या माजी कर्णधार आणि ‘बीसीसीआय’च्या प्रशासकीय समितीच्या सदस्या डायना एडल्जी यांनी भारतीय संघाच्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीची प्रशंसा केली आहे. ‘‘एकदिवसीय सामना दुसऱ्या दिवशी खेळवणे हे दुर्दैव म्हणावे लागेल. रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले. धोनीने संपूर्ण स्पर्धेदरम्यान चांगली कामगिरी केली. त्यामुळे  धोनीमध्ये बरेच क्रिकेट शिल्लक आहे. संघातील युवा खेळाडूंना धोनीच्या मार्गदर्शनाची गरज आहे,’’ असे एडल्जी यांनी सांगितले.

भारतीय खेळाडू टप्प्याटप्प्याने मायदेशी परतणार

विश्वचषकातील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर भारतीय खेळाडू आता टप्प्याटप्प्याने मायदेशी परतणार आहेत. ‘‘तिकिटांच्या उपलब्धतेनुसार हे खेळाडू टप्प्याटप्प्याने आपापल्या ठिकाणी किंवा समूहाने मायदेशी परतणार आहेत,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले. काही खेळाडू लंडनमध्येच थांबणार असून काही जण दोन आठवडय़ांच्या सुट्टीसाठी दुसऱ्या देशात जाणार आहेत. महेंद्रसिंह धोनी काही दिवसांनंतर रांचीत परतरणार आहे.

फिजियो फरहाट यांचा कार्यकाळ संपुष्टात

भारताचे फिजियोथेरपिस्ट पॅट्रिक फरहाट यांचा कार्यकाळ न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर संपुष्टात आला आहे. आपल्याला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे आभार मानले आहेत. २०१५ पासून फरहाट भारतीय संघासोबत होते.

संघातील सर्व खेळाडूंचा, प्रशिक्षकांचा, माझ्या कुटुंबीयांचा आणि मुख्यत्वे तुम्हा सर्व चाहत्यांचा मी सदैव ऋणी राहीन. विश्वचषक जिंकण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावले, परंतु थोडक्यात कमी पडलो.

-जसप्रीत बुमरा, वेगवान गोलंदाज

सर्वप्रथम इंग्लंडमध्ये येऊन प्रत्येक सामन्यात आमचे प्रोत्साहन वाढवणाऱ्या चाहत्यांचे शतश: आभार. तुमच्या पाठिंब्यामुळेच ही स्पर्धा आमच्यासाठी संस्मरणीय ठरली. उपांत्य फेरीतील पराभवामुळे आम्हीही निराश झालो आहोत. परंतु संपूर्ण स्पर्धेत आम्ही आमचे १०० टक्के योगदान दिले. जय हिंद!

-विराट कोहली, भारताचा कर्णधार

क्रिकेट हा विश्वातील सर्वोत्तम खेळ आहे. एका क्षणाला तुम्हाला सर्वाच्या नजरेत खाली पाडतो आणि पुढच्या क्षणाला तुम्हाला तारासुद्धा बनवतो. विश्वचषक भारतात आणण्यात आम्ही अपयशी ठरलो. परंतु यापुढेही तुम्ही मला आणि भारतीय संघातील सर्व खेळाडूंना कायमस्वरूपी प्रोत्साहन द्याल, हीच अपेक्षा!

-रवींद्र जडेजा, अष्टपैलू खेळाडू

आयुष्यभर स्मरणात राहणारी स्पर्धा. माझ्या पहिल्या विश्वचषक स्पर्धेचा शेवट मनासारखा झाला नसला तरी येथे मिळालेले अनेक धडे, चाहत्यांचे प्रेम माझ्यासोबत कायमस्वरूपी राहील. मला सर्व भारतीय खेळाडूंचा अभिमान वाटतो आणि चाहत्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नव्हते. संघाचे फिजिओथिरपिस्ट पॅट्रिक यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा!

-हार्दिक पंडय़ा, अष्टपैलू खेळाडू